Nashik Fire: नाशिक येथील Currency Note Press परिसरात आग, मुख्य इमारत सुरक्षीत असल्याने धोका टळला
हा परिसर अत्यंत संवेदनशील म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या परिसरात आग भडकल्याने एकच खळबळ उडाली.
नाशिक (Nashik) येथील करन्सी नोटप्रेसच्या (Currency Note Press) आवारात गुरुवारी दुपारी आग (Fire) भडकली. हा परिसर अत्यंत संवेदनशील म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या परिसरात आग भडकल्याने एकच खळबळ उडाली. या ठिकाणीच भारतीय चलनी नोटांची छापाई होते. नोटांचा छापखाना असलेल्या इमारतीच्या पाठीमागे असलेल्या गोदाम परिसरातील गवताल सुरुवातीला आग लागली. त्यानंतर ही आग मोठ्या प्रमाणावर पसरत गेली. अल्पावधीतच आगीच्या ज्वाळा वाढत गेल्या. आगीचे रुप पाहून तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.
अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करुन ही आग आटोक्यात आणली. दरम्यान, गवताला लागलेल्या आगीमुळे ही आग भडकल्याची प्राथमिक माहिती असली तरी, मुळात गवतालाच आग का लागली याबबत अद्याप स्पष्टता नाही. आगीमुळे झालेल्या नुकसानाचीही पुरेशी माहिती नाही. मात्र, इतक्या संवेदनशील परिसरात आग भडकल्याने सर्वच स्तरातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (हेही वाचा, Currency Note Press in Nashik: नाशिक करन्सी नोट प्रेस येथून पाच लाख रुपये गायब)
नाशिकचे करन्सी नोट प्रेस फार जुनी आहे. ब्रिटीश काळापासून या ठिकाणी नोटांचा छापखाना आहे. ब्रिटिशांनी 1924 मध्ये पहिल्यांदा या ठिकाणी नोटांची छापाई सुरु केली. त्या वेळी सुरुवातीला 5 रुपयांची नोट या ठिकाणी छापण्यात येत असे. पुढे 1980 पर्यंत पाच रुपयांच्या नोटा याच प्रेसमध्ये छापल्या जात. मात्र कालांतराने यात बदल होत पाच रुपयांच्या नोटांसोबतच 10, 20, 50, 100, 200, 500 रुपयांच्या नोटाही छापल्या या ठिकाणी छापल्या जाऊ लागल्या. सांगितले जाते की या प्रेसमधून दरवर्षी सरासरी 4 हजार दशलक्ष नोटा छापल्या जातात.