BMC Chairpersons Election: स्थायी समिती आणि शिक्षण समितीच्या निवडणुका ठरणार महानगरपालिकेच्या निवडणूकीची तालिम

यात शिवसेनेचा झेंडा फडकण्याची दाट शक्यता आहे. शिवसेनेचे यशवंत जाधव, भाजपकडून आसिफ जकारिया आणि कॉंग्रेसचे राजेश्री शिरवडकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. स्थायी समितीत 26 सदस्य आहेत.

BMC | (Photo Credits: Facebook)

BMC Chairpersons Election: आज म्हणजेचं 5 एप्रिल रोजी होणाऱ्या स्थायी समिती (Standing Committee) आणि शिक्षण समिती (Education Committee) निवडणुका (Election) पुढील वर्षी होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीची (BMC Election) तालिम मानली जात आहे. या निवडणुकीत मुख्य स्पर्धा सत्ताधारी शिवसेना आणि भाजप पक्षात आहे. यात काँग्रेसने सहभाग घेतल्याने ही स्पर्धा अधिक रंजक बनविली आहे. महानगरपालिकेच्या निवडणूकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र राहतील की नाही यासंदर्भात आज निर्णय होईल. महापालिका विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी सांगितलं की, त्यांची भूमिका विरोधी पक्षाची आहे. अशा परिस्थितीत सत्ताधारी पक्षाला विरोध करणे आणि त्यांच्या विरोधात लढा देणे हे आपले कर्तव्य आहे. बीएमसी निवडणुका एकट्याने लढणार असल्याचा दावा करणाऱ्या काँग्रेसने रिंगणात भाग घेतला तर काँग्रेसविना महाविकास आघाडी होणार हे निश्चित आहे. असं झाल्यास शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. सध्या राष्ट्रवादी आणि समाजवादी पार्टीने यांनी आपली पत्ते उघडलेले नाहीत. सपाचे गटनेते रईस शेख यांनी सांगितले की, आम्ही सध्या याबाबत निर्णय घेतलेला नाही. शेवटच्या क्षणी अंतिम निर्णय घेऊ. पण भाजपला पराभूत करणे, हीच आमची भूमिका असेल.

नामनिर्देशनाच्या वेळी राष्ट्रवादीचे गट नेते राखी जाधव ज्या प्रकारे यशवंत जाधव यांच्यासमवेत उभे राहिले, त्यावरून ते शिवसेनेच्या विरोधात नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ते भाजपला पराभूत करण्यासाठी कुणाबरोबरही जाऊ शकतात, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. यावरून हे स्पष्ट झाले आहे की, राष्ट्रवादी व सपा थेट किंवा अप्रत्यक्षपणे शिवसेनेला पाठिंबा देतील. (वाचा - महाराष्ट्र: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात स्थानिक निवडणुका 3 महिने पुढे ढकलल्या)

दरम्यान, महापालिकेची निवडणूक पाहता कॉंग्रेसने आपली रणनीती बदलली आहे. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या समित्यांच्या निवडणुकांच्या शेवटच्या क्षणी कॉंग्रेसने आपली भूमिका बदलली होती. या वेळीही काँग्रेस हे करू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. पक्ष नेतृत्वाकडून जे सांगितलं जाईल, ते आम्ही करून, असंही रवी राजा यांनी सांगितलं आहे. स्थायी समिती व शिक्षण समिती अध्यक्षांची निवडणूक आज होत आहे. यात शिवसेनेचा झेंडा फडकण्याची दाट शक्यता आहे. शिवसेनेचे यशवंत जाधव, भाजपकडून आसिफ जकारिया आणि कॉंग्रेसचे राजेश्री शिरवडकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. स्थायी समितीत 26 सदस्य आहेत. शिवसेनेचे 11 सदस्य, भाजपचे 10, कॉंग्रेसचे 3, राष्ट्रवादीचे 1 आणि सपाचे 1 सदस्य आहेत. जरी शिवसेनेला कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि सपाची मते मिळाली नाहीत तरीही शिवसेना जिंकेल.

यशवंत जाधव यांना चौथ्यांदा संधी -

यशवंत जाधव यांच्यावर सलग चौथ्यांदा शिवसेनेने विश्वास व्यक्त केला आहे. स्थायी समितीतील मतांचे गणित पाहता असे म्हणता येईल की, पुन्हा एकदा बीएमसीच्या तिजोतीची चावी जाधव यांच्या हाती जाण्याची शक्यता आहे. जाधव यांना शिवसेनेत अंतर्गत विरोध होत असला तरी त्यांना मातोश्रीवरून मोठे पाठबळ आहे.