'दिशाहीन असलेल्या माळी समाजाला राज्यव्यापी नेतृत्वाची गरज'; महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अनिल महाजन यांनी व्यक्त केले मत
राज्यव्यापी नेतृत्व नसल्यामुळे व असलेले नेतृत्व समाजाला मान्य नसल्यामुळे राज्यात माळी समाजाची खूप वाईट अवस्था आहे आणि हे सर्व राजकीय पक्षातील पुढाऱ्यांना चांगले माहीत आहे.'
माळी समाजाच्या सुरु असलेल्या अहवेलनेबाबत महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अनिल महाजन यांनी आपले मत मांडून समाजाला काही आवाहने केली आहे. ते म्हणतात, ‘खंडीभर पेंडी येथून तेथून, आपलीच बाग, सर्वात मोठी शेती पण त्यात पिकेना काहीच, अशी सध्याची परिस्थिती राज्यात माळी समाजाची झालेली आहे. प्रत्येक राजकीय पक्ष आपल्या सोयीने माळी समाजाचा लोणच्यासारखा वापर करून पद्धतशीरपणे चौथा बाहेर करत आहे. ‘सार गाव मामाचं आणि कोणी नाही कामाचं’ अशी गत सध्या माळी समाजाची झालेली आहे. संघटना पायलीला पंधरा पण एकही दखलपात्र नाही. समाजात तरुण युवा राजकीय नेतृत्व उभे राहण्याची गरज आहे. जे खरे आपल्या समाजासाठी झटू शकतील अशाच लोकांना समाजाने संधी दिली पाहिजे.’
‘स्वतःचा व स्वतःच्या नातेवाईकांचा विचार करणाऱ्या माळी समाजातील नेत्यांची आता समाजाला गरज नाही. ‘जुना पुराना भंगार फेको नया फर्निचर घर पर लाओ’ या वृत्ती प्रमाणे समाजातील तरुणांनी काम केले पाहिजे. राजकारणात मला काय मिळेल यासाठी सर्व बाजूने अनेकांचा तळफळाट सुरू आहे. एक खातो तर दुसऱ्यांचे पोट दुखते, ही वृत्ती माळी समाजामध्ये बंद झाली पाहिजे. एका संघटनेचा कार्यक्रम झाला की लगेच दुसऱ्या संघटनेच्या नेत्यांचा जीव कसा-बसा होतो. लगेच आपली प्रतिष्ठा ठीकवण्यासाठी थातूर-मातूर कार्यक्रमाचे आयोजन केले जातात. पण माळी समाजातील तरुणांना व कार्यकर्त्यांना कळले पाहिजे की राज्यातील राजकारणी लोक हे सोपे नाहीत. राजकारणी खूप आतल्या गाठीचे असतात.’
‘राज्यातील माळी समाज खरच दिशाहीन झाला आहे. राज्यव्यापी नेतृत्व नसल्यामुळे व असलेले नेतृत्व समाजाला मान्य नसल्यामुळे राज्यात माळी समाजाची खूप वाईट अवस्था आहे आणि हे सर्व राजकीय पक्षातील पुढाऱ्यांना चांगले माहीत आहे. त्यामुळे राजकीय पक्षात असो की सरकारमध्ये असो मुख्य प्रवाहात माळी समाजाला जोपर्यंत स्थान मिळत नाही. तोपर्यंत समाजाला भविष्य नाही नवीन पिढी आल्याशिवाय कदापिही राज्यव्यापी नेतृत्व माळी समाजाला मिळणार नाही. तुम्ही माळी समाजाचे तुणतुणा कितीही वाजवा पण या राजकीय पुढार्यांना जाग येत नाही. आणि माळी समाजाला न्याय मिळत नाही. कमरेचे सोडून डोक्याला नेसण्याची पद्धत समाजातील काही लोक जोपर्यंत बंद करत नाही. तोपर्यंत समाजाचा विकास शक्य नाही. समाजातील लोकांनी राजकीय पुढाऱ्यांकडे आपला स्वाभिमान गहान ठेवणे बंद करा नाहीतर आताची पिढी खपली आहे. आणि पुढचीही पिढी खपणार.’
‘एकी नसलेल्या समाजाला राजकीय भविष्य नाही. याच्या त्याच्या पुढे लोटांगण घालण्यापेक्षा स्वाभिमानाने जगा आणि आपले व समाजाचे अस्तित्व राखा. राजकारण या महासागरामध्ये कोण विचारतय तुमच्या या सामाजिक संघटनांना ते पण पायलीला 15 संघटना आहेत या मध्ये विखुरलेल्या समाजाला कोणीही किंमत देत नाही. साधा तलाठी उभं करत नाही तुम्हाला. सामाजिक संघटनांच्या कितीही बैठका घ्या कितीही मेळावे घ्या कोण विचारते तुमच्या अशा समाज बैठका आणि मेळाव्यांना. मला काही तरी मिळेल या हेतूने व नेत्याला खुश करण्यासाठी घेतलेल्या सामाजिक बैठकांना आणि मेळाव्यांना विचारतोय कोण? कोणीही दखल घेत नाही. अशा हजारो बैठका आणि हजारो मेळावे झाले तरी निष्पन्न काही निघत नाही. मेंढरासारखे जमायचे आणि मेंढरासारखे निघून जायचे. हातात काहीच नाही. अशा बैठका मेळाव्यातून समाजाचे प्रबोधन होत नाही. त्यामुळे अशा निरर्थक संघटन करण्याला महत्त्व नाही.’
‘वैचारिक व्यासपीठ जो पर्यंत समाजात तयार होणार नाही आणि सर्वजण एकत्र येत नाही तोपर्यंत राज्यात माळी समाजाचा विकास होणे अशक्य आहे. कुठलीही निवडणूक निवडून आलेल्या माळी लोकप्रतिनिधीही कडे जेव्हा तुम्ही माळी म्हणून जातात जेव्हा तुम्ही सांगता मी माळी आहे तेव्हा तोच प्रतिनिधी तुमची किंमत शून्य करतो, तुमची टिंगल करतो आणि म्हणतो की समाज वैगरे मी मानत नाही मला सर्व समाजाने मतदान केले आहे माझ्या पक्षाने मला निवडून आणले आहे. तेथे आपलाच माणूस आपले खच्चीकरण करतो. त्यामुळे समाजात नवचैतन्य निर्माण करण्याची गरज आहे. म्हणून आम्ही म्हणतो की दिशाहीन माळी समाजाला राज्यव्यापी नेतृत्वाची गरज आहे.’
अनिल महाजन, प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र माळी समाज महासंघ.
मोबाईल नंबर - ९९६७७१७१७१ / ९५९४७५४७२५.
ई-मेल - anil.maza@gmail.com
वेबसाईट - www.anilmahajan.com