Maharashtra Kesari 2023 Date: 65 व्या ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेचे आयोजन यंदा पुण्यात होणार; येथे पाहा तारखा
संयोजक माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी या संदर्भात कुस्ती स्पर्धेच्या आयोजनाची अधिकृत जबाबदारी संस्कृती प्रतिष्ठानला दिल्याचे पत्र भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्याकडून स्वीकारल्याची माहिती दिली आहे.
Maharashtra Kesari 2023 Date: महाराष्ट्राला कुस्तीचा मोठा इतिहास लाभला आहे. महाराष्ट्राच्या कुस्ती विश्वातील सर्वात प्रतिष्ठेची समजल्या जाणाऱ्या 65 व्या ‘महाराष्ट्र केसरी’ (Maharashtra Kesari) स्पर्धेचे 11 ते 15 जानेवारी 2023 दरम्यान पुण्यात (Pune) आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या आयोजनाचा मान संस्कृती प्रतिष्ठानला मिळाला आहे. संयोजक माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी या संदर्भात कुस्ती स्पर्धेच्या आयोजनाची अधिकृत जबाबदारी संस्कृती प्रतिष्ठानला दिल्याचे पत्र भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्याकडून स्वीकारल्याची माहिती दिली आहे. दरम्यान, कुस्ती महासंघाने महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या तारखा आणि ठिकाण लवकरात लवकर कळवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दरम्यान, ब्रिजभूषण सिंह यांना या स्पर्धेचे निमंत्रण देण्यात आले आहे. यावेळी राज्य कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस, पुणे जिल्हा कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष पै. संदीप भोंडवे, पुणे राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष योगेश दोडके उपस्थित होते. ब्रिजभूषण सिंह यांनी या स्पर्धेचे निमंत्रण स्वीकारले असल्याचेही मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. (हेही वाचा - Maharashtra Kesari Kusti Spardha 2023: अहमदनगर येथे रंगणार 'महाराष्ट्र केसरी कुस्ती' स्पर्धेचा आखाडा, कसा असेल कार्यक्रम? घ्या जाणून)
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धा अधिकृतपणे कोण भरवणार यासंदर्भात संभ्रम होता. परंतु, आता कुस्ती महासंघाने संस्कृती प्रतिष्ठानच्या आयोजनावर शिक्कामोर्तब केलं आहे. त्यामुळे यंदा महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या आयोजनाचा मान संस्कृती प्रतिष्ठानला मिळाला आहे.
महाराष्ट्रातील सर्वात मोठा मान असणाऱ्या 64 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेतच्या विजेतेपदाचा मान कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटीलने पटकावला होता. तथापी, आगामी काळात होणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी पैलवानांनी तयारीही सुरू केली आहे. मागील 3 महिन्यांपूर्वी अध्यक्ष पदावरून वाद निर्माण झाला होता. महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेवरून तडस गट आणि लांडगे गट असा वाद आहे.