Thane Water Cut: ठाण्यात 8 सप्टेंबरला काही भागात 24 तास पाणी कपात; जाणून घ्या कोणकोणत्या भागांचा समावेश
त्यामुळे मुबलक पाण्याचा साठा करावा आणि पाण्याचा अपव्यय टाळावा असं आवाहन टीएमसी कडून करण्यात आलं आहे.
ठाणे महानगर पालिकेकडून (Thane Mahanagar Palika) देण्यात आलेल्या माहितीनुसार ठाण्यात जलवाहिनीच्या तातडीच्या दुरूस्ती आणि देखभालीच्या कामासाठी शुक्रवार 8 सप्टेंबर दिवशी पाणीपुरवठा 24 तास बंद ठेवला जाणार आहे. त्यामुळे दहीहंडीच्या दुसर्या दिवशी काही भागात पाणी कपात असणार आहे याची नागरिकांनी नोंद घ्यावी. 8 सप्टेंबर दिवशी सकाळी 9 ते 9 सप्टेंबर दिवशी सकाळी 9 वाजेपर्यंत हा पाणीपुरवठा बंद असणार आहे.
STEM Authority कडून तातडीचं काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे ठाण्याच्या काही भागातील पाणीपुरवठ्यावर शुक्रवारी परिणाम होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने घोडबंदर रोड, लोकमान्य नगर, वर्तक नगर, साकेत, रितूपार्क, जेल, गांधी नगर, रूस्तमजी, इंदिरानगर, रूपादेवी,श्रीनगर, सामता नगर, सिद्धेश्वर, इटरनिटी, जॉन्सन, मुंब्रा आणि कळवा भागाचा समावेश आहे.
शुक्रवारी 24 तास पाणीपुरवठा बंद ठेवून काम झाल्यानंतर पुढे 1-2 दिवस देखील पाणी कमी दाबाने येणार आहे. त्यामुळे मुबलक पाण्याचा साठा करावा आणि पाण्याचा अपव्यय टाळावा असं आवाहन टीएमसी कडून करण्यात आलं आहे.
यंदा पावसानेही मागील महिन्याभरापासून दडी मारली असल्याने अद्याप जलसाठे पूर्ण क्षमतेने भरलेले नाहीत. त्यामुळे एकूणच पाण्याचा वापर सांभाळून करण्याचे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. आज मुंबई, ठाण्यात पावसाच्या जोरदार सरी सकाळ पासून बरसत आहेत. त्यामुळे गोविंदाच्या आनंदाला आणि उत्साहाला उधाण आलेलं आहे.