IPL Auction 2025 Live

ठाणे: ट्रेनच्या दारात स्टंटबाजी करताना खांबाला आपटून 20 वर्षीय मुलाचा कळवा- मुंब्रा दरम्यान मृत्यू

कल्याण (Kalyan) वरून सुटणाऱ्या गाडीत दरवाजाबाहेर लटकून स्टंट करत असताना खांबाला आपटल्याने कळवा (Kalwa)- मुंब्रा (Mumbra) स्थानकाच्या दरम्यान एका 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याचे समजतेय

Representational Image | (Photo Credits: ANI)

ट्रेनने प्रवास करत असताना दरवेळी सुरक्षेच्या संदर्भात अनेक सूचना दिल्या जातात, रेल्वेच्या दारात उभे राहू नये, बाहेर डोकावून पाहू नये वैगरे वैगरे.. या सूचना अनेकदा सोशल मीडियावर थट्टेचा विषय ठरतात. अनेक मंडळी तर या सूचनांना धाब्यावर बसवून सर्रास दरवाजामध्ये लटकून स्टंटबाजी करताना दिसतात. पण हाच निष्काळजीपणा कल्याण मधील एका युवकाच्या जीवावर बेतला आहे. कल्याण (Kalyan) वरून सुटणाऱ्या गाडीत दरवाजाबाहेर लटकून स्टंट करत असताना खांबाला आपटल्याने कळवा (Kalwa)- मुंब्रा (Mumbra) स्थानकाच्या दरम्यान एका 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याचे समजतेय. ही घटना गुरुवारची असून मृत तरुणाचे दिलशात नौशाद खान असे आहे. येत्या 21 जानेवारीला दिलशात हा 21 वर्षाचा होणार होता मात्र त्याआधीच या दुर्घटनेत त्याला आपला जीव गमवावा लागला आहे. रेल्वे अपघात टाळण्यासाठी चर्चगेट स्थानकात नवे बफर्स; कसे काम करणार हे बफर्स?

प्राप्त माहितीनुसार, दिलशात हा गुरुवारी आपल्या भावाच्या लग्नाचे कपडे घेण्यासाठी गोवंडीला जात होता. आपल्या मित्रांसोबत असताना त्याने ट्रेन पकडल्यापासूनच दारात उभे राहून स्टंट करायला सुरुवात केली. यावेळी त्याचे मित्र त्याला आणखीन प्रोत्साहन देत व्हिडीओ काढू लागले. हाच प्रकार सुरु असताना त्याला अचानक खांबाचा धक्का लागून तो ट्रेनमध्येच फेकला गेला. हा धक्का इतका तीव्र होता की त्यामुळे दिलशात पूर्णपणे बेशुद्ध झाला होता. यावेळी, त्याच्या मित्रांनी पुढील स्टेशन येताच त्याला रेल्वे पोलिसांच्या साहाय्याने जवळच्या दवाखान्यात नेले मात्र तिथे पोहचताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या मुळे खान कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, अलीकडेच दिलशात याला रुग्णवाहिकेचा ड्रायव्हर म्ह्णून नोकरी मिळाली होती, त्याच्या पाठीमागे तीन बहिणी असून त्याचे वडील नौशाद खान हे टॅक्सी चालक आहेत.

दरम्यान, या घटनेबाबत सांगताना रेल्वे पोलिसांनी दिलशात याची चूक असल्याचे स्पष्ट केले. संपूर्ण डब्बा रिकामा असतानाही त्याने दरवाज्यावर उभे राहून स्टंटबाजी करणे हेच मृत्यूचे कारण असल्याचे पोलिसांनी म्हंटले आहे. अशा प्रकारच्या अनेक घटना मागील वर्षात घडल्या होत्या, यातील नियमभंग करणाऱ्या अनेकांकडून रेल्वेने दंड घेत समज दिली होती मात्र तरीही प्रवाशांचा गैरजबाबदारपणा कमी होत नाही हे दुःखद आहे.