Thane: अग्निशमन विभागाच्या NOC शिवाय काम करणारी ठाण्यातील तीन रुग्णालये बंद

अधिकाऱ्यांनी सांगितले की या रुग्णालयांमध्ये अग्निशमन विभागाकडून मिळणारे 'ना हरकत प्रमाणपत्र' नव्हते

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit: Pixabay)

अग्निशमन विभागाच्या ना हरकत प्रमाणपत्र (NOC) शिवाय काम करण्याच्या आरोपावरून महाराष्ट्रामधील, ठाणे (Thane) येथील कळवा भागात तीन रुग्णालये बंद करण्यात आली आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की या रुग्णालयांमध्ये अग्निशमन विभागाकडून मिळणारे 'ना हरकत प्रमाणपत्र' नव्हते आणि बायोमेडिकल कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी योग्य सुविधादेखील नाहीत. ठाणे महानगरपालिकेने बुधवारी भास्कर नगरमधील 'साई सेवा आरोग्य केंद्र' (Sai Seva Health Centre) आणि वाघोबा नगरातील 'जन सेवा रुग्णालय' (Jana Seva Hospital) व 'श्री मातोश्री आरोग्य केंद्र' (Sri Matoshri Arogya Kendra) बंद करण्याचे आदेश जारी केले.

सिटी युनिटने सांगितले की, मुंबई उच्च न्यायालयाने आपल्या एका आदेशात म्हटले आहे की, ज्या रुग्णालयांना अग्निशमन विभागाकडून एनओसी मिळालेली नाही आणि जी बायोमेडिकल कचरा विल्हेवाट लावल्याशिवाय कार्यरत आहेत, अशी रुग्णालये बंद केली जावीत. या रुग्णालयांना यापूर्वीही नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मुंबईमध्ये याआधी अनेकवेळा आगीच्या घटना घडल्या आहेत. पावसाळ्यामध्ये तर हे प्रमाण अजूनच वाढते. अशा परिस्थितीमध्ये सुरक्षेचा उपाय म्हणून याआधी बीएमसी व टीएमसीने रुग्णालयांना झापले आहे. (हेही वाचा: डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा प्रसूतीनंतर मृत्यू; नातेवाईकांचा रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप)

हे झाले रुग्णालयाच्या हलगर्जीपणा बाबत, मात्र ठाण्यात रुग्णांची आर्थिक फसवणूक होत असल्याच्या अनेक घटना समोर आली आहेत. कोरोनाच्या काळात तर या घटना फार वाढल्या आहेत. ठाणे जिल्ह्यातील 17 खासगी रुग्णालयांनी (Private Hospitals) कोविड-19 रूग्णांकडून 1.82 कोटी रुपये अधिक वसूल केले असल्याची बाब नुकतीच समोर आली होती. त्यापैकी अजूनही 1.40 कोटी परत केले गेलेले नाहीत. सोमवारी अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली.

ज्यादाच्या बिलाबाबत रुग्णांच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी, शहरातील 17 रुग्णालयांचे 4,106 बिले तपासण्यासाठी लेखा परीक्षकांची एक टीम गठीत केली. त्यानुसार 10 जुलै ते 21 ऑगस्ट या कालावधीमधील बिले तपासली गेली आणि त्यातील 1,362 बिलांमध्ये एकूण 1.82 कोटी ज्यादा आकारले असल्याचे आढळून आले.



संबंधित बातम्या