Thane Shocker: पैशासाठी नवऱ्याने दाबला बायकोचा गळा, मृतदेह पिंपात भरुन अंबनाथच्या जंगलात फेकला; टिटवाळा येथील घटना
पीडितेने माहेरकडून 80 हजार रुपये आणून आरोपीला दिलेही होती. मात्र, आरोपीस आणखी पैसे हवे होते. त्यासाठी तो तिचा छळ करत असे. घटना घडली त्या दिवशीही त्यांच्यामध्ये पैशावरुनच वाद झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
Titwala News: ठाणे पोलिसांनी (Thane Shocker) एका रिक्षाचालकास अटक केली आहे. कौटुंबीक वादातून (Domestic Violence) पत्नीची गळा दाबून हत्या (Husband Wife News) केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. ही घटना टिटवाळा येथे मंगळवारी (5 डिसेंबर) घडली. मयुद्दीन (वय 38 वर्षे) असे आरोपीचे नाव आहे. तर, अलीमुना अन्सारी असे पीडितेचे नाव आहे. ती 35 वर्षांची आहे. रिक्षा खरेदी करण्यासाठी माहेरहून पैसे आणण्यासाठी आरोपी पीडितेकडे तगादा लावत असे. पीडितेने माहेरकडून 80 हजार रुपये आणून आरोपीला दिलेही होती. मात्र, आरोपीस आणखी पैसे हवे होते. त्यासाठी तो तिचा छळ करत असे. घटना घडली त्या दिवशीही त्यांच्यामध्ये पैशावरुनच वाद झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
'होय, मी तिला ठार मारले आहे'
आरोपी, पत्नी आणि मुलगा असे तिघे ठाणे जिल्ह्यातील कल्याण परिसरातील टिटवाळा येथे राहात होते. मुलगा सकाळी शाळेला गेल्यानंतर दोघांमध्ये काही कारणांवरुन वाद झाला. आरोपीने रागाच्या भरात टोकाचे पाऊल उचलत पत्नीचा गळा दाबला. ज्यामध्ये श्वास गुदमरल्याने पत्नीचा मृत्यू झाला. दरम्यान, पीडितेची आई पीडितेला फोन लावत होती. मात्र, बराच काळ रिंग वाजूनही तिने फोन स्वीकारला नाही. अखेर मुलगी फोन का उचलत नाही, हे विचारण्यासाठी तिने आपल्या जावयास फोन लावला. यावर जावई असलेल्या आरोपीने सांगितले की, ती फोन उचलत नाही कारण मी तिला ठार मारले आहे आणि तिचा मृतदेह ड्रममध्ये भरुन जंगलात फेकला आहे. मी आता पोलीस स्टेशनला आहे. तूसुद्धा पोलीस स्टेशनला ये, असे त्याने सांगितले. (हेही वाचा, Palghar: चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली पत्नीची हत्या; पालघर येथील घटना, आरोपी पतीला अटक)
मृतदेह पिंपात भरुन अंबरनाथच्या जंगलात फेकला
आरोपीने अत्यंत क्रूरपणे हे कृत्य केले आहे. एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपी 250 लिटरचा एक ड्रम घेऊन आला होता. त्या ड्रममध्ये पीडितेचा मृतदेह भरुन तो ड्रम त्याने एकट्याने रिक्षात भरला आणि अंबरनाथ येथील जंगलात टाकू दिला. आरोपीने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी तपास केला असता अंबरनाथच्या जंगलात पीडितेचा मृतदेह आढळून आला. (हेही वाचा, Crime: मुंबईत घटस्फोटाची मागणी करणाऱ्या पत्नीची हत्या, टॅक्सी चालक अटकेत)
आगोदर काठीचे प्रहार मग आवळला गळा
आरोपी टिटवाळा परिसरात रिक्षा चालवत असे. रिक्षा चालवणे हेच या जोडप्याचे उदरनिर्वाहाचे साधन होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती आणि पत्नी यांच्यात घरगुती भांडणे हा नित्याचाच भाग होता. ही घटना घडली तेव्हा आज सकाळीही त्यांच्यात काही कारणावरुन भांडण झाले. ज्यामध्ये आरोपीने पत्नीला आगोदर काठीने मारले. त्यानंतर त्यांने तिचा गळा दाबला आणि तिची हत्या केली. आरोपीने पीडितेला अत्यंत क्रूरपणे ठार केल्याचे समजते. त्याने आगोदर लाकडी दांडक्याने पीडितेच्या डोक्यावर वार केले. ज्यामध्ये घाव वर्मी लागल्याने ती बेशुद्ध पडली. त्यानंतर त्याने तिचा गळा आवळला.
पोलिसांकडून आरोपीला अटक, मृतदेह ताब्यात
दरम्यान, परिसरातील नागरिकांकडून घटनेची माहिती कळताच टिटवाळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला आणि आरोपीलाही अटक केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल प्राप्त होताच अनेक गोष्टी स्पष्ट होतील. दरम्यान, आम्ही आरोपीला अटक केली असून त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांद्वारे गुन्हा दाखल केला आहे. त्याचा जबाब घेण्याचे काम सुरु असून तपासही सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.