हवेत गोळीबार करुन वाढदिवस साजरा; ठाणे येथील शिवसेना नगरसेवक पुत्राचा प्रताप
त्यामुळे पोलीस या प्रकाराबाबत काय भूमिका घेतात याबाबत उत्सुकता आहे.
मित्रांसोबत वाढदिवस साजरा करताना हातातील पिस्तूलाने हवेत गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रताप एका व्हायरल व्हिडिओमधून पुढे आला आहे. हा व्हिडिओ लोनावळ्यातील एका हॉटेल परिसरातील असल्याचे समजते. तसेच, गोळीबार करताना व्हिडिओत दिसणारा व्यक्ती हा ठाण्यातील नगरसेवकाचा मुलगा असल्याची चर्चा सुरु आहे. गेल्या काही दिवसात नेत्यांच्या मुलांनी वाढदिवसानिमित्त हातात नंग्या तरवारी घेऊन केक कापण्याच्या किंवा हवेत गोळीबार केल्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे पोलीस या प्रकाराबाबत काय भूमिका घेतात याबाबत उत्सुकता आहे.
दरम्यान, हा व्हिडिओ ठाण्यातील शिवसेना नगरसेवक संजय पांडे यांच्या मुलाचा असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. नील पांडे असे या मुलाचे नाव आहे. नऊ तारखेला त्याचा वाढदिवस होता. व्हडिओमध्ये दिसते आहे की, आजूबाजूला अंधार आहे. लाईटच्या प्रकशात नील पांडे हा खुर्चीवर बसला आहे. त्याच्या एका हातात एक प्लेट आहे. दरम्यान, एक व्यक्ती त्याला पिस्तूल आणून देते. ही पिस्तूल हातात घेऊन निल पांडे याने हवेत गोळीार केला. व्हिडिओत डिजेवर गाणी लावल्याचेही काहीसे ऐकू येते.(हेही वाचा, डबलबारी बंदुकीतून हवेत गोळीबार, लक्ष्मीपूजनाला फटाक्यांसारखा आवाज; शिरोलीचे सरपंच शशिकांत खवरे यांच्यावर गुन्हा दाखल)
दरम्यान, या प्रकाराबद्दल पोलीसांनी अद्याप कोणतीही कारवाई केली, नसल्याचे एबीपी माझाने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. दरम्यान, शिवसेनेतूनही अद्याप या प्रकाराबाबत कोणतीही प्रतिक्रीया आली नाही.