ठाणे महानगरपालिका कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी सज्ज; कळवा येथील रुग्णालयामध्ये 8 बेडचा नवीन Isolation Ward
अशात ठाणे महानगरपालिका (TMC) या विषाणूशी लढण्यास सज्ज होत आहे
देशातील कोरोना व्हायरसचे (Corona Virus) प्रमाण आणि भीती दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. सध्या देशात 30 जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. सध्या या विषाणूबाबत मुंबई (Mumbai) येथे चार जण कस्तुरबा आणि हिंदुजा रुग्णालयात (P. D. Hinduja Hospital) दाखल आहेत. मात्र अजूनतरी या विषाणूची लागण झालेला रुग्ण हिंदुजामध्ये नसल्याचे सांगण्यात आले आहे. ठाण्यातील (Thane) 12 लोकांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहेत. अशात ठाणे महानगरपालिका (TMC) या विषाणूशी लढण्यास सज्ज होत आहे.
हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, ठाणे महानगरपालिकाने कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलमध्ये आठ बेडचे आयसोलेशन वॉर्ड स्थापन केले आहे. टीएमसीचे आरोग्य अधिकारी अनिरुद्ध माळगावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'विमानतळ प्राधिकरण आणि राज्य सरकारने आम्हाला कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव असलेल्या देशांमधून शहराला भेट देणार्या 12 प्रवाश्यांची माहिती दिली. आम्ही या विषाणूची लक्षणे तपासण्यासाठी त्यांच्या घरी भेटी दिल्या, त्यापैकी कोणत्याही व्यक्तीमध्ये ही लक्षणे आढळली नाहीत. मात्र, आम्ही पुढील 14 दिवस दररोज त्यांना भेट देऊ. सध्या तरी आमच्याकडे शहरात कोरोनाव्हायरसचा कोणतेही संशयित रुग्ण किंवा याबाबत पुष्टी झाली नाही.'
दरम्यान, मुंबई महानगपालीका व महाराष्ट्र शासनाने याबाबत 24X7 हेल्पलाईन क्रमांक सुरु केले आहेत. बीएमसीने मुंबई शहरातील कोरोनाव्हायरस प्रकरणे नोंदवण्यासाठी 1916 हा नंबर सुरु केला आहे. तर महाराष्ट्र सरकारने खास कोरोना व्हायरससाठी हेल्पलाईन क्रमांक '020-26127394' सुरू केला आहे. आजपर्यंत कोरोनाव्हायरसने जगभरात 95,000 हून अधिक लोकांना संक्रमित केले आहे आणि किमान 3,300 लोकांचा बळी घेतला आहे. (हेही वाचा: कोरोना व्हायरस दहशतीच्या पार्श्वभूमीवर वाढत्या मागणीमुळे Mask आणि Hand Sanitisers ची बाजारात कमतरता तर किंमतीत दुप्पटीने वाढ)
केंद्र सरकार आणि राज्य सरकारही याबाबत आपल्या परीने उपाययोजना करत आहे. कोरोना व्हायरसबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद काल पार पडली. त्यामध्ये त्यांनी, 'राज्यातील लोकांना कोरोना व्हायरसच्या परिस्थितीबाबत घाबरून जाण्याची गरज नाही. मात्र जनतेने आता सतर्क असले पाहिजे कारण पुढचे आठ दिवस फार महत्वाचे आहेत.' असे सांगितले.