Thane Illegal Pubs and Bars: ठाण्यातील बेकायदेशीर पब-बार तसेच अमली पदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांवर महापालिकेची कारवाई; अवैध बांधकामांवर फिरवला गेला बुलडोझर
या कारवाईत महापालिका कार्यक्षेत्रातील शाळा, महाविद्यालयापासून 100 मीटर अंतराच्या आत असलेल्या एकूण 31 पानटपऱ्या जप्त करण्यात आल्या,
ठाणे आणि मिरा-भाईंदर (Thane Mira Bhayandar) शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी शहरातील बेकायदेशीर पब्ज, बारवर कठोर कारवाई करावी. तसेच शहरातील अमली पदार्थांशी निगडित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवून ती नष्ट करण्यात यावीत, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन्ही शहरांचे महापालिका आयुक्त आणि पोलिस आयुक्त यांना दिले. पुण्यात काही तरुण अमली पदार्थांचे सेवन करीत असल्याचे नुकतेच निदर्शनास आले होते. याची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री शिंदे यांनी पुणे पोलीस आयुक्त आणि मनपा आयुक्तांना तेथील अमली पदार्थांशी संबंधित अनधिकृत बांधकामे बुलडोझर लावून नष्ट करण्याचे आदेश दिले होते.
त्यानंतर पुणे शहरामध्ये या संदर्भात व्यापक कारवाया करण्यात आल्या. आता तशाच पद्धतीने ठाणे शहर आणि मीरा-भाईंदर शहरातील अमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामे ही बुलडोझर लावून नष्ट करण्यात यावीत, अशा सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत. अमली पदार्थामुळे तरुणाईचे मोठे नुकसान होत आहे. हा विळखा तातडीने रोखणे महत्त्वाचे आहे. यासाठी अत्यंत कडक उपाय योजण्यात यावेत. अमली पदार्थ विक्रेत्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरु करावी. शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय योजावेत, असे निर्देशही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.
ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या आदेशानुसार ठाणे महापालिका क्षेत्रातील पब, बार व अमली पदार्थ विक्री करणारी अवैध बांधकामे निष्कसित करण्याची कार्यवाही हाती घेण्यात आली. या कारवाईत महापालिका कार्यक्षेत्रातील शाळा, महाविद्यालयापासून 100 मीटर अंतराच्या आत असलेल्या एकूण 31 पानटपऱ्या जप्त करण्यात आल्या, तर हॉटेल, पब्ज, बार असे मिळून 8 ठिकाणी तर 9 शेडवर कारवाई करण्यात आली. वागळे प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील पंचशील बार, इंडियन स्वाद बार, अनधिकृत पानटपरी, गुटखा विक्रेते यांचेवर कारवाई करण्यात आली. (हेही वाचा: Maharashtra Assembly Session: पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन विरोधक आक्रमक, विधीमंडळाच्या पायऱ्यावर घोषणाबाजी)
कळवा प्रभाग समितीमधील शाळा परिसरालगत 100 मीटरच्या आत असलेल्या पानटपऱ्यांवर तसेच अनधिकृत बार यांच्यावर कारवाई करण्यात आली. दिवा प्रभागसमिती अंतर्गतही संपूर्ण विभागाचा सर्व्हे करुन शाळांपासून 100 मीटर परिसरात असलेल्या पानटपऱ्या तसेच अनधिकृत हॉटेल, बार यांच्यावर ठोस कारवाई करण्यात आली. महापालिका कार्यक्षेत्रातील अनधिकृत हॉटेल, पब्ज, बार तसेच पानटपऱ्या पूर्णपणे निष्कसित होईपर्यत सदरची कारवाई सातत्याने सुरू राहणार असल्याची माहिती उपायुक्त जी.जी. गोदेपुरे यांनी यावेळी दिली.