Thane: मुंब्रा येथील रुग्णालयाला आग, 4 जणांचा मृत्यू; सीएम उद्धव ठाकरे यांच्याकडून मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख नुकसान भरपाई जाहीर
या आगीच्या दुर्घटनेमध्ये चार जणांचा मृत्यू झाला. पहाटे 3.40 च्या सुमारास ही आग लागली
महाराष्ट्रामध्ये सध्या कोरोना विषाणूचा हाहाकार सुरु आहे, अशात राज्यात घडत असलेल्या इतर दुर्घटना शासनाच्या चिंता वाढवत आहेत. याआधी नाशिक येथे ऑक्सिजन गळतीमुळे जवळजवळ 22 रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर विरार येथे रुग्णालयाला आग लागून 13 रुग्णांचा मृत्यू झाला होता. आता ठाण्यातील (Thane) मुंब्रा (Mumbra) येथील प्राइम क्रिटिकल केअर हॉस्पिटलमध्ये आज सकाळी आगीमुळे मोठा अपघात झाला. या आगीच्या दुर्घटनेमध्ये चार जणांचा मृत्यू झाला. पहाटे 3.40 च्या सुमारास ही आग लागली. रुग्णांना दुसर्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे व सध्या बचाव कार्य सुरू आहे.
याबाबत माहिती देताना ठाणे महानगरपालिकेने सांगितले की, ‘ठाणे मुंब्रा येथील प्राइम क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये आज पहाटे 3:40 च्या सुमारास आग लागली. अग्निशमन यंत्रणा आणि एक बचाव वाहन घटनास्थळावर आहे. अग्निशमन यंत्रणा आग विझवण्याचा प्रयत्न करीत आहे. रूग्णांना दुसर्या रुग्णालयात हलविताना चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.’
न्यूज 18 लोकमतच्या मते, रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर आग लागली. मुंब्रा पोलिसांसह अग्निशमन दलाच्या तीन निविदा, दोन पाण्याचे टँकर आणि बचाव वाहन, रुग्णवाहिका, आरडीएमसी आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. रुग्णालयात एकूण 26 रुग्ण असल्याचे सांगण्यात आले, त्यापैकी 6 रुग्ण आयसीयूमध्ये होते. मंत्री जितेंद्र आव्हाडही घटनास्थळी पोहोचले आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याच्या संशय त्यांनी व्यक्त केला. ही आग नेमकी कशामुळे लागली याबाबत समिती नेमून चौकशी केली जाईल असेही त्यांनी सांगितले. (हेही वाचा: वेदांत हॉस्पिटल मधील कोविड रूग्णांच्या मृत्यूप्रकरणी 6 जणांच्या उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशीचे आदेश - एकनाथ शिंदे)
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाख आणि जखमींना 1 लाख रुपयांची नुकसान भरपाई जाहीर केली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच विरारमधील तिरुपती नगर येथील विजय वल्लभ हॉस्पिटलच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील अतिदभता विभागात (ICU) मध्यरात्री तीनच्या सुमारास आग लागली होती. या आगीत 13 जणांचा मृत्यू झाला आहे.