IPL Auction 2025 Live

ठाणे: मीरा रोड येथे 13 वर्षीय मुलाची आत्महत्या; पालकांनी मोबाईल काढून घेतल्याने उचलले टोकाचे पाऊल

पालकांनी मोबाईल फोन काढून घेतल्याने या अल्पवयीन मुलाने टोकाचे पाऊल उचलले अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Suicide | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

ठाणे (Thane) जिल्ह्यातील मीरा रोड (Miraroad) येथे एका 13 वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पालकांनी मोबाईल फोन काढून घेतल्याने या अल्पवयीन मुलाने टोकाचे पाऊल उचलले असल्याचे पोलिसांनी शनिवारी (30 मे) सांगितले. ही घटना मंगळवारी (26 मे) घडली. शाळेत शिकणारा 13 वर्षीय मुलगा सातत्याने मोबाईलवर खेळत असे. त्यावरुन अनेकदा त्याचे पालक त्याला ओरडत असतं, असे नवघर पोलिस स्टेशन (Navghar Police Station) मधील इन्स्फेक्टर प्रकाश बिराजदार (Inspector Prakash Birajdar) यांनी सांगितले.

अलिकडेच पालकांनी त्याचा फोन काढून घेतला आणि तेव्हापासून तो मुलगा नाराज होता. 26 मे रोजी त्याने फासावर लटकून स्वतःचे जीवन संपवले. याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, असे बिराजदार यांनी सांगितले. (पुणे: कोरोना झाल्याच्या भितीने आत्महत्या केलेल्या तरुणाचा अहवाल निगेटिव्ह)

आजकालच्या शालेय मुलांमध्ये मोबाईलचे प्रचंड वेड पाहायला मिळते. मोबाईलवर गेम खेळणे, व्हिडिओज पाहणे, सोशल मीडिया यात दिवसरात्र ते गर्क असतात. त्यात आता कोविड-19 लॉकडाऊनमुळे बराच वेळ मोकळा मिळाला आहे. तसंच बाहेर जाणे शक्य नसल्याने दिवसभर मोबाईल घेऊन बसणे हा एक विरंगुळा झाला आहे. त्यामुळे या काळात मुलांचे मोबाईल प्रेम अधिकच वाढले नसेल तर नवलच. यापूर्वी मोबाईल काढून घेतल्याने टोकाचे पाऊल उचल्याच्या अनेक घटना आपल्या समोर आल्या आहेत. दरम्यान मोबाईलचा अति नाद योग्य नाही, हे सर्वच जाणतात. तरी मोबाईलचे वेड कमी करणे हे पालकांपुढील मोठे आव्हान आहे. दरम्यान कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून कोरोना होण्याच्या किंवा झाला आहे या भीतीने आत्महत्या करण्याच्या अनेक घटना समोर येत आहेत.