Mumbai Metro चे 'ऑपरेशन फेल' आशिष शेलारांचा ठाकरे सरकारवर निशाणा

मेट्रो ट्रेनला विलंब, कधी मेट्रो ट्रेनच रद्द, तर कधी सॉफ्टवेअर समस्या आहेत.

Mumbai Metro | (Photo Credits: twitter)

मुंबई मध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मेट्रो 2 ए आणि मेट्रो 7 चं उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र या मेट्रो लाईनवर अर्धमार्गिका खुल्या करण्यात आल्या आहेत.  उद्धाटनानंतर सलग तिसर्‍या दिवशी मेट्रो बंद पडत असल्याने आता विरोधकांनी त्यावरून महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. भाजपाच्या आशिष शेलारांनी (Ashish Shelar) मुंबई मेट्रोचं (Mumbai Metro) ऑपरेशन फेल असं म्हणत ट्वीट देखील केले आहे.

मेट्रो लोकार्पणानंतर पहिल्याच दिवशी बंद पडली. मेट्रो ट्रेनला विलंब, कधी मेट्रो ट्रेनच रद्द, तर कधी सॉफ्टवेअर समस्या आहेत. योग्य तपास न करता मुंबई मेट्रो सुरू करण्यात आली आहे, या मेट्रोचे अजून 15 दिवस काम बाकी असूनही ठाकरे सरकारने याच्या उद्घाटनाचा घाट घातला. खोट्या पीआरसाठी मुंबईकरांचा जीव धोक्यात घालू नका. असं ट्वीट त्यांनी केले आहे. नक्की वाचा: मुंबईमधील मेट्रोच्या 2 नवीन मार्गांचे उद्घाटन; जाणून घ्या स्थानकांची नावे, दर आणि वेळा.

आशिष शेलार ट्वीट

मुंबई मेट्रो लोकांसाठी खुली केल्यानंतर सलग तिसर्‍या दिवशी त्याची सेवा विस्कळीत होत असल्याचं पहायला मिळत आहे. मागाठणे स्टेशन मध्ये मेट्रो बंद पडल्यानंतर प्रवाशांना दुसर्‍या मेट्रोने प्रवास करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तर ओवरीपाडा मध्येही तांत्रिक बिघाड झाल्याने तिकीटाचे पैसे परत देण्याची वेळ मेट्रोवर आली.