Tata Mumbai Marathon 2024: टाटा मुंबई मॅरेथॉन 2024 साठी पश्चिम रेल्वे सुरु करणार पहाटेच्या प्रवासासाठी अतिरिक्त विशेष ट्रेन, जाणून घ्या सविस्तर

एका अधिकाऱ्याने सांगितले की, या उपक्रमाचा उद्देश मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्तींचा प्रवास सुलभ करणे, सहभागी आणि प्रेक्षकांसाठी सोयीस्कर आणि वेळेवर प्रवास सुनिश्चित करणे हा आहे.

Tata Mumbai Marathon 2024 (Photo Credits: Facebook/@Tata Mumbai Marathon)

Western Railway Additional Special Trains: येत्या 21 जानेवारी, रविवारी होणाऱ्या टाटा मुंबई मॅरेथॉन 2024 (Tata Mumbai Marathon 2024) च्या पार्श्वभूमीवर, पश्चिम रेल्वेने तीन अतिरिक्त विशेष स्लो लोकल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मॅरेथॉनच्या सहभागींना सामावून घेण्यासाठी पहिली विशेष ट्रेन पहाटे 2.15 वाजता विरार ते चर्चगेट असा प्रवास सुरू करेल. त्यानंतर दुसरी ट्रेन चर्चगेटहून पहाटे 3 वाजता वांद्र्याच्या दिशेने सुटेल. तिसरी विशेष सेवा बोरिवलीहून पहाटे 3.05 वाजता चर्चगेटला जाणार आहे.

उत्तम प्रवेशयोग्यता सुनिश्चित करण्यासाठी, या गाड्या मार्गावरील सर्व स्थानकांवर थांबतील. एका अधिकाऱ्याने सांगितले की, या उपक्रमाचा उद्देश मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्तींचा प्रवास सुलभ करणे, सहभागी आणि प्रेक्षकांसाठी सोयीस्कर आणि वेळेवर प्रवास सुनिश्चित करणे हा आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुरू होणाऱ्या या मॅरेथॉनसाठी 56,000 हून अधिक स्पर्धकांनी नोंदणी केली आहे.

महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी 11 जानेवारी रोजी मॅरेथॉन विषयी सांगितले होते की, ‘जगभरातून सहभागी होण्यासाठी येणाऱ्या सर्व स्पर्धकांसाठी हे मुंबई मॅरेथॉन आणखी एक आकर्षण आहे.’ केवळ 20 वर्षांमध्ये मुंबई मॅरेथॉन देशातली सर्वात लोकप्रिय मॅरेथॉन झाली आहे. मुंबई मॅरेथॉनमुळे भारताचे नाव जगातील मॅरेथॉनच्या नकाशावर आले आहे. सुदृढ आरोग्यासह पर्यावरण रक्षणासाठी प्लास्टिक मुक्ती,झाडे वाचवा,पाण्याची बचत असे विविध सामाजिक जनजागृतीपर संदेश या मॅरेथॉनमध्ये नागरिकांकडून दिला जातो. (हेही वाचा: Fine on Mumbai Airport: मुंबई विमानतळाला ठोठावला 90 लाखांचा दंड; प्रवाशांनी रनवेवर रात्रीचे जेवण केल्याप्रकरणी BCAS आणि DGCA ची मोठी कारवाई)

दरम्यान, मुंबई मॅरेथॉन 2024 चे पहिले सहभागी म्हणून महाराष्ट्राचे प्रथम नागरिक, राज्यपाल रमेश बैस यांच्या स्वाक्षरीने हा कार्यक्रम राजभवन, मुंबईच्या भव्य प्रांगणात सुरू करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुरु होणाऱ्या मुंबई मॅरेथॉनमध्ये जगभरातून धावणारे उत्साही सहभागी होणार आहेत. टाटा मुंबई मॅरेथॉन 2024 ही भारतातील सर्वात मोठी आणि आशियातील एका प्रतिष्ठित मॅरेथॉन स्पर्धा आहे. या स्पर्धेसाठी यंदा 267 एनजीओनी एकत्रितपणे विक्रमी 58 कोटी रुपये उभारले आहे.