Talathi Exams 2023 Row in Maharashtra: महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तलाठी परीक्षा केंद्रावर आज सर्व्हर डाऊन; परीक्षा केंद्राबाहेर गोंधळ

नागपूर, अमरावती,लातूर, अकोला मध्ये तलाठी परीक्षा दिवशी असा प्रकार घडल्याने विद्यार्थ्यांनी सरकार विरूद्ध चिड व्यक्त केली आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा (File Image)

महाराष्ट्रामध्ये चार वर्षांच्या प्रतिक्षेनंतर आता तलाठीची परीक्षा होत आहे. पण पहिल्याच दिवशी पेपर फूटल्याची चर्चा, हायटेक कॉपी प्रकरणं यानंतर आता सर्व्हर डाऊन चा प्रकार समोर आला आहे. नागपूर, अमरावती सेंटर्स वर आज सकाळी सर्व्हर डाऊन झाल्याने परीक्षा केंद्रांबाहेर गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. आज (21 ऑगस्ट) च्या सकाळी परीक्षार्थी सकाळी 9 वाजता वाजता परीक्षा केंद्रांवर पोहचले. यावेळी सर्व्हर मध्ये बिघाड झाल्याने अनेक विद्यार्थ्यांना बाहेरच उभं ठेवण्यात आल्याचा प्रकार नागपूर मध्ये MIDC केंद्राबाहेर घडला.

नागपूर, अमरावती,लातूर, अकोला मध्ये तलाठी परीक्षा दिवशी असा प्रकार घडल्याने विद्यार्थ्यांनी सरकार विरूद्ध चिड व्यक्त केली आहे. राज्यात 17 ऑगस्ट पासून तलाठीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. यासाठी 4 हजार 644 जागांसाठी10 लाख पेक्षा जास्त विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले आहेत. आज सकाळी 9 ते 11 वाजता पहिल्या सत्राची परीक्षा होती. मात्र त्यावेळी सर्व्हर डाऊन झाल्याचा प्रकार आता समोर आला आहे.

आज परीक्षेच्या पहिल्या सत्रात सर्व्हर डाऊन मुळे अनेक परीक्षार्थी त्याला मुकले आहेत. त्यामुळे लांबून परीक्षा केंद्रांवर आलेले विद्यार्थी परीक्षेला जाऊ न शकल्याने संतप्त झाले आहेत. आता या परीक्षेला मुकलेल्यांना पुन्हा परीक्षेला बसता येणार का? यावर अद्याप विद्यार्थ्यांना काहीही सांगण्यात आलेले नाही.