Liquor Home Delivery: स्विगी, बिगबास्केट आणि झोमॅटो करणार अल्कोहोल वितरण?

स्विगी (Swiggy), बिगबास्केट (BigBasket) आणि झोमॅटो (Zomato) सारख्या लोकप्रिय ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर लवकरच बिअर (Beer), वाइन (Wine) आणि लिकर (Liquor) यांसारखी कमी-अल्कोहोल मिश्रीत पेये वितरीत करणे सुरू करण्याची शक्यता आहे.

Liquor Home Delivery | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

स्विगी (Swiggy), बिगबास्केट (BigBasket) आणि झोमॅटो (Zomato) सारख्या लोकप्रिय ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर लवकरच बिअर (Beer), वाइन (Wine) आणि लिकर (Liquor) यांसारखी कमी-अल्कोहोल मिश्रीत पेये वितरीत करणे सुरू करण्याची शक्यता आहे. इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, नवी दिल्ली, कर्नाटक, हरियाणा, पंजाब, तामिळनाडू, गोवा आणि केरळ या राज्यांमध्ये नवीन सेवेसाठी पायलट प्रोजेक्ट राबविण्याचा कंपन्यांकडून विचार सुरु असल्याचे समजते. घरपोच मद्यपुरवठा सेवा (Liquor Home Delivery) सुरु झाल्यास त्याचे दुरगामी परिणाम होऊ शकतात, अशी चिंता सामाजिक अभ्यासकांनी आगोदरच व्यक्त केली आहे.

सद्यस्थिती आणि संभाव्य बदल

सध्या फक्त ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये अल्कोहोलच्या होम डिलिव्हरीला परवानगी आहे. इतर राज्यांतील अधिकारी या हालचालीचे फायदे आणि तोटे यांचे मूल्यांकन करत आहेत. सर्व कायदे, नियम आणि फायद्या-तोट्यांवर आणि त्यांच्या दूरगामी परिणामांवर विचार झाल्यानंतर निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान, निर्णय जर कंपन्यांच्या दृष्टीकोणातून सकारात्मक आला तर लवकरच स्विगी (Swiggy), बिगबास्केट (BigBasket) आणि झोमॅटो या ऑनलाईन फूड डिलिव्हरी करणाऱ्या ई-कॉमर्स कंपन्या मद्यदेखील घरपोच वितरीत करु शकतात. (हेही वाचा, Zomato, Swiggy Hikes Platform Fee: आता झोमॅटो आणि स्विगीवरून खाद्यपदार्थ मागवणे होणार महागडे; कंपन्यांनी केली प्लॅटफॉर्म फीमध्ये वाढ)

घरपोच मद्यपुरवठा सेवेचे समर्थन करणाऱ्या उद्योजकांच्या एका गटाने सांगितले की, "या उपक्रमाचा उद्देश मोठ्या शहरांमधील वाढत्या प्रवासी लोकसंख्येची पूर्तता करणे आणि जेवण किंवा मनोरंजनात्मक क्रियांचा एक भाग म्हणून मध्यम अल्कोहोलयुक्त पेये सेवन करु पाहणाऱ्या ग्राहकांच्या बदलत्या प्राधान्यांची पूर्तता करणे आहे." या सेवेचा फायदा विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना होऊ शकतो, ज्यांना पारंपारिक दारूची दुकाने अप्रिय वाटतात.

ऑनलाईन मद्य वितरणाचे फायदे

स्विगी येथील कॉर्पोरेट अफेअर्सचे उपाध्यक्ष दिनकर वशिष्ठ यांनी ऑनलाइन डिलिव्हरी मॉडेल्सच्या फायद्यांवर प्रकाश टाकला. "ऑनलाइन प्रणाली संपूर्ण व्यवहार नोंदी, वय पडताळणी आणि नियामक आवश्यकतांचे पालन सुनिश्चित करतात. ते वितरण वेळ, ड्राय डे आणि क्षेत्रीय निर्बंधांचे देखील पालन करतात," असेही ते म्हणाले.

पूर्वानुभव आणि भविष्यातील संभावना

COVID-19 लॉकडाऊन दरम्यान, महाराष्ट्र, झारखंड, छत्तीसगड आणि आसाम या राज्यांनी काही निर्बंधांसह तात्पुरती मद्य वितरणास परवानगी दिली. ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये, किरकोळ उद्योगाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ऑनलाइन वितरणामुळे विक्रीत 20-30% वाढ झाली आहे.

द बीअर कॅफेचे मुख्य कार्यकारी राहुल सिंग यांनी विश्वास व्यक्त करत म्हटले की, ऑनलाइन मद्य वितरण सुविधा वाढवेल, आर्थिक वाढीला चालना देईल आणि जबाबदार अल्कोहोल वितरण सुनिश्चित करताना जागतिक ट्रेंडशी संरेखित होईल. "राज्ये ग्राहकांची सोय सुधारू शकतात आणि मद्याची ऑनलाइन होम डिलिव्हरी सक्षम करून आर्थिक वाढ करू शकतात," असेही ते म्हणाले. दरम्यान, घरपोच मद्यपुरवठा धोरणाचा दूरगामी परिणाम होऊ शकतो. तो जाणवायला काही काळ जावा लागेल, असे अभ्यास सांगतात.