Suicide Due To Body Shaming: पती सतत ‘लठ्ठ’ म्हणून चिडवायचा; अपमानाला कंटाळून महिलेची आत्महत्या, भायखळा येथील घटना, गुन्हा दाखल

लग्नानंतर घरातील कामांवरून अस्लमच्या पालकांशी तहमीनाची सतत भांडणे होऊ लागली, त्यामुळे जोडप्याने वेगळे राहण्याचा निर्णय घेतला.

Suicide | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Suicide Due To Body Shaming: बॉडी शेमिंग (Body Shaming) म्हणजेच एखाद्याच्या शरीराची, आकाराची किंवा रंगाची चेष्टा करणे हे अपराधापेक्षा कमी नाही. बॉडी शेमिंगमुळे समोरची व्यक्ती मानसिकदृष्ट्या खचून त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. आता मुंबईमध्ये (Mumbai) याच बॉडी शेमिंगला कंटाळून एका महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरात एका 33 वर्षीय महिलेने पती सतत ‘लठ्ठ’ म्हणून चिडवत असल्याच्या रागातून आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. मुंबईतील भायखळा परिसरात ही घटना घडली आहे.

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी मृत महिलेच्या आईच्या तक्रारीवरून पती आणि त्याच्या बहिणीवर गुन्हा दाखल केला. तेहमिना अस्लम कांदे असे मृत महिलेचे नाव आहे. इंडियन एक्स्प्रेसमध्ये दिलेल्या वृत्तानुसार, तेहमिनाने 14 फेब्रुवारी रोजी तिच्या आईच्या घरी आपले जीवन संपवले. यावेळी तिची आई, रझिया वसीम अन्सारी (69) घरात नव्हती.

माहितीनुसार, तहमीना अस्लम कांदे हिचे जानेवारी 2016 मध्ये अस्लम कांदे (43) याच्याशी विवाह झाला होता. लग्नानंतर घरातील कामांवरून अस्लमच्या पालकांशी तहमीनाची सतत भांडणे होऊ लागली, त्यामुळे जोडप्याने वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. पुढे तहमीना आणि अस्लम यांच्यातही भांडणे होऊ लागली. अशाच एका भांडणामध्ये, अस्लमने तहमीनाच्या मानसिक स्थितीवर भाष्य केले. तेहमीनाच्या बिघडलेल्या मानसिक स्थितीमुळे ती क्षुल्लक मुद्द्यांवरून भांडत राहते असे तो म्हणाला.

त्यानंतर या भांडणांना कंटाळून अस्लमने तहमीनाला तिच्या आईच्या घरी सोडले. जेव्हा आईने याबाबत विचारणा केली, तेव्हा तेहमीनाने सांगितले की, तिचा नवरा तिला मारहाण करतो, कधीच बाहेर घेऊन जात नाही, तसेच तिला तिच्या वैयक्तिक वापरासाठी फारच कमी पैसे दिले जातात. तहमीनाच्या आईने आरोप केला आहे की, तहमीना अस्लमकडे परतल्यानंतरही त्याने तिच्याशी भांडण करणे सुरूच ठेवले. तहमीनाचे बाहेर अफेअर असल्याचा त्याला संशय होता. याच संशयातून अस्लमने आपल्या मुलीला सोशल मीडिया वापरण्यास मनाई केल्याचा आरोपही मृत महिलेच्या आईने केला आहे. (हेही वाचा: लग्नाआधी आपले 'हसणे' बदलण्याची डॉक्टरांकडे गेला तरुण; ‘स्माइल डिझायनिंग’ शस्त्रक्रियेदरम्यान झाला मृत्यू, हैदराबादमधील धक्कादायक घटना)

तिने पुढे दावा केला की, तिचा जावई तिच्या मुलीला नेहमी टोमणे मारत असे. ‘तू जाड आहेस, दिसायला चांगली नाहीस, तुला कसे राहावे-वागावे कळत नाही’, असे म्हणत तो नेहमी तेहमीनाला घालून-पाडून बोलत असे. सतत तिचा अपमान करत असे. याशिवाय तेहमीनाला मुल होत नसल्यानेही अस्लम तिच्यावर चिडचिड करायचा. याच सर्व जाचाला आणि त्रासाला कंटाळून तेहमीनाने आत्महत्या केल्याचा आरोप आहे. आता अस्लम आणि त्याच्या बहिणीवर भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif