Dhule: फेसबुक लाईव्ह करून धुळ्यातील युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न; आयर्लंडचे फेसबुक अधिकारी आणि महाराष्ट्र पोलिसांच्या मदतीने वाचले प्राण

त्यानंतर या अधिकाऱ्याने महाराष्ट्र पोलिसांशी संपर्क साधून या युवकाचा जीव वाचवला. या सर्व घटनाक्रमामध्ये मुंबई पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

DCP Rashmi Karandikar (PC - Facebook)

Dhule: फेसबुक लाईव्ह (Facebook Live) करून धुळे जिल्ह्यातील एका तरुणाने आत्महत्येचा (Suicide) प्रयत्न केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. मात्र, आयर्लंडचे फेसबुक अधिकारी (Irish Facebook Officials) आणि महाराष्ट्र पोलिसांच्या (Maharashtra Police) प्रयत्नांमुळे या तरुणाचे प्राण वाचवण्यात आले आहेत. संबंधित तरुण फेसबुक लाईव्ह करून आत्महत्या करत असल्याचे आयर्लंड फेसबुक अधिकाऱ्याच्या निदर्शनास आले. त्यानंतर या अधिकाऱ्याने महाराष्ट्र पोलिसांशी संपर्क साधून या युवकाचा जीव वाचवला. या सर्व घटनाक्रमामध्ये मुंबई पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी धुळे पोलिसांना सूचना देत मोठा अनर्थ टाळला.

प्राप्त माहितीनुसार, रविवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास धुळ्यातील तरुण फेसबुकवर लाईव्ह आला. त्यानंतर या तरुणाने आपल्या मनगटाची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार आयर्लंडमधील फेसबुक कर्मचाऱ्यांच्या लक्षात आला. त्यानंतर या अधिकाऱ्याने मुंबई पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांना फोन केला. त्यानंतर रश्मी करंदीकर यांनी धुळे पोलिसांशी संपर्क साधून यासंदर्भात सूचना दिल्या. धुळे पोलिसांनी तात्काळ या तरुणाचा शोध घेतला आणि त्याचे प्राण वाचवले. (हेही वाचा - Bjp Deputy Mayor Rajesh Kale Arrested: सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांना अटक; उपयुक्तांना शिवीगाळ आणि खंडणी मगितल्याप्रकरणी गुन्हा दाखल)

दरम्यान, आत्महत्येचा प्रयत्न करणारा युवक हा धुळे शहरातील एका होमगार्डचा मुलगा आहे. पोलिसांनी तरुणाच्या फेसबुक लॉकेशनच्या साहाय्याने तो राहात असलेल्या ठिकाणाचा शोध घेतला. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी तात्काळ या तरुणाला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. सोमवारी या तरुणाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. या सर्व प्रकारात महाराष्ट्र पोलिसांच्या तत्परतेमुळे तरुणाचे प्राण वाचवण्यात यश आलं. यात रश्मी करंदीकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.