शिवस्मारकाचे काम थांबवण्याचे राज्य सरकारचे आदेश; पर्यावरणवाद्यांनी घेतला आक्षेप
पर्यावरणवाद्यांनी घेतलेल्या आक्षेपामुळे राज्य सरकारला हे पाऊल उचलावे लागले आहे
मुंबई : अरबी समुद्रात (Arabian Sea) आकार घेत असलेल्या शिवस्मारका (Shiv Smarak) चे काम ताबडतोब थांबवण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. पर्यावरणवाद्यांनी घेतलेल्या आक्षेपामुळे राज्य सरकारला हे पाऊल उचलावे लागले आहे. याबाबत दोन दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने तोंडी आदेश दिले होते, याचे पालन करत राज्य सरकारने आज लेखी आदेश जारी केले आहेत. त्यानुसार लवकरच या शिवस्मारकाचे काम थांबवले जाईल. काम थांबवण्याच्या आदेशानंतर कंत्राटदाराला द्याव्या लागणाऱ्या निधीवर सार्वजनिक बांधकाम विभाग फेरविचार करणार आहे.
शिवस्मारक हा फडणवीस सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. याचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. मुंबईच्या गिरगाव चौपाटीजवळ 16.86 हेक्टरच्या खडकाळ परिसरात हे स्मारक उभारले जाणार आहे. मात्र यामुळे समुद्रातील जलचर आणि जैवविविधतेला धोका पोहचू शकतो, असे पर्यावरणवाद्यांचे म्हणणे आहे. यासंदर्भात याचिका कोर्टात दाखल करण्यात आली होती, त्यानंतर सुप्रीम कोर्टाने हे काम थांबण्याचे तोंडी आदेश दिले. आता त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने लेखी आदेश देऊन हे काम थांबवले आहे. (हेही वाचा : विनायक मेटे यांनी अंधाऱ्या रात्री गुपचूप उरकले शिवस्मारकाचे भूमिपूजन)
उभारणीचे कंत्राट ‘एल ऍण्ड टी’ म्हणजेच लार्सेन आणि टुब्रो कंपनीला दिले आहे. पुढच्या आदेशापर्यंत कामकाज बंद राहणार असल्याने या कंपनीला देण्यात येणाऱ्या निधीचाही पुन्हा एकदा विचार केला जाणार आहे.