'राज्य कायद्याचे आहे पप्पा किंवा पप्पूचे नाही', अतुल भातखळकरांनी नाना पटोलेंवर साधला निशाणा
"राज्य कायद्याचे आहे पप्पा किंवा पप्पूचे नाही" अशा शब्दांत त्यांनी ट्विटच्या माध्यमातून त्यांच्यावर टिकास्त्र सोडले आहे.
सध्या इंधन दरवाढीवरून वातावरण खूप ढवळून निघाले आहे. त्यात महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आक्रमक भूमिका घेत बिग बी अमिताभ बच्चन आणि खिलाडी अक्षय कुमार यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन यांचे सिनेमे आणि शुटिंग बंद पाडण्याचा इशारा नाना पटोले यांनी दिला आहे. यावरून भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी नाना पटोले यांनी त्यांच्यावर जोरदार टिका केली आहे. "राज्य कायद्याचे आहे पप्पा किंवा पप्पूचे नाही" अशा शब्दांत त्यांनी ट्विटच्या माध्यमातून त्यांच्यावर टिकास्त्र सोडले आहे.
"नाना पटोले काँग्रेस महाराष्ट्रात आणीबाणी लागू करणार आहे का? सत्ता तुमची असली तरी तुमची मनमानी चालणार नाही. देश घटनेच्या चौकटीत आणि कायद्यानुसार चालतो, तुमच्या मर्जीवर नाही. राज्य कायद्याचे आहे पप्पा किंवा पप्पूचे नाही." अशी टिका अतुल भातखळकर यांनी केले आहे.हेदेखील वाचा- अमिताभ बच्चन, अक्षय कुमार यांनी मोदी सरकारच्या अत्याचाराविरोधात भूमिका मांडावी अन्यथा महाराष्ट्रात सिनेमे बंद पाडू; नाना पटोले यांचा इशारा
काय म्हणाले नाना पटोले?
काँग्रेस सरकारच्या काळात मनमोहन सिंह पंतप्रधान असताना इंधन दरवाढीवरुन आक्रमक भूमिका घेणारे अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), अक्षय कुमार (Akshay Kumar) आता शांत का? असा सवाल नाना पटोले (Nana Patole) यांनी विचारला आहे. तर मोदी सरकारच्या देशाविषयी धोरणात या कलाकारांनी भूमिका न मांडल्यास महाराष्ट्रात त्यांचे सिनेमे बंद पाडू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर वाढल्यामुळे सर्वसामान्यांचं जगणं कठीण झालं आहे. परंतु, मनमोहन सिंह सरकारच्या काळात अमिताभ बच्चन, अक्षय कुमार ट्विटच्या माध्यमातून टीका करायचे ते आता शांत का? असा संतप्त सवाल नाना पटोले यांनी केला आहे. तसंच मनमोहन सिंह सरकार काळात ज्या लोकशाही मार्गाने ट्विट करत होते. त्यापद्धतीने मोदी सरकार विरोधाताही भूमिका मांडावी अन्यथा त्यांचे सिनेमे महाराष्ट्रात चालू देणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.