Southwest Monsoon 2024 Updates: केरळ मध्ये मान्सून आला; महाराष्ट्रात पहा कधी पर्यंत होऊ शकेल आगमन

1 ते 3 जून या कालावधीत मध्य प्रदेश, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गडगडाट, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास) यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी पडण्याची शक्यता आहे.

Rain | Representational image (Photo Credits: pxhere)

यंदा उन्हाच्या तीव्र झळांनी नैऋत्य मोसमी पाऊस (Southwest Monsoon) अखेर काल (30 मे) केरळमध्ये दाखल झाला असून संपूर्ण नागालँड, मणिपूर, मिझोराम, अरुणाचल प्रदेश आणि त्रिपुरा, मेघालय आणि आसामच्या बहुतांश भागांसह ईशान्य भारताचा बहुतांश भागही त्याने व्यापला असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. येत्या 2-3 दिवसात, मध्य अरबी समुद्राच्या आणखी काही भागात, दक्षिण अरबी समुद्र, लक्षद्वीप क्षेत्र आणि केरळचा उर्वरित भाग, कर्नाटकचा काही भाग, तामिळनाडू, नैऋत्य आणि मध्य बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग, आसाम आणि मेघालयाचा उर्वरित भाग, हिमालयालगत पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या काही भागात तो दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे.

उत्तर प्रदेश आणि लगतच्या भागात चक्रीय अभिसरण असून वरून खालच्या तपावरण स्तरावर पश्चिम बंगालपर्यंत द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढील 5 दिवसात बिहार, झारखंड, गंगीय पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगड येथे आणि 1 ते 3 जून या कालावधीत मध्य प्रदेश, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गडगडाट, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास) यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी पडण्याची शक्यता आहे. गुजरात राज्यात 30 आणि 31 मे रोजी जोरदार भूपृष्ठीय वारे (30-40 किमी प्रतितास वेगाने) वाहण्याची शक्यता आहे.

पंजाबच्या बहुतांश भागात, हरियाणा-चंदीगड-दिल्ली, उत्तर प्रदेशच्या अनेक भागांमध्ये; राजस्थान, बिहार, पूर्व मध्य प्रदेशच्या काही भागात; ओडिशा, झारखंड येथे सध्या तुरळक ठिकाणी उष्ण ते तीव्र उष्णतेची लाट आहे. छत्तीसगड, विदर्भ, हिमाचल प्रदेशच्या काही भागात, पश्चिम मध्य प्रदेशच्या तुरळक भागात उष्णतेच्या लाटेची स्थिती राहणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.

42° सेल्सिअसपेक्षा अधिक कमाल तापमान असलेले क्षेत्र म्हणजे हरियाणा-चंदीगड-दिल्लीच्या बहुतांश भागात, पश्चिम राजस्थानच्या अनेक भागात, पश्चिम मध्य प्रदेशातील काही भागात आणि पूर्व मध्य प्रदेश, पूर्व उत्तर प्रदेश, झारखंड, ओडिशा येथे तुरळक ठिकाणी काल कमाल तापमान 46-50°सेल्सिअस दरम्यान नोंदवले गेले आहे. पुढील 5 दिवसात वायव्य आणि मध्य भारतात कमाल तापमानात हळूहळू 2-4 अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. पुढील 3 दिवसात महाराष्ट्र आणि दक्षिण द्वीपकल्पीय भारतात कमाल तापमानात 2-3° सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.