'दिल्लीतील काही लोक युपीए-2 स्थापन करण्याच्या तयारीत', संजय राऊतांचा गौप्यस्फोट

यावेळी त्यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांनाही चांगलंच सुनावलं आहे.

Shiv Sena MP Sanjay Raut (PC - ANI)

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी युपीएमध्ये सुरु असलेल्या शीतयुद्धाबाबत गौप्यस्फोट केला आहे. ' राष्ट्रीय पातळीवर यूपीए बळकट होण्यासाठी त्याचं नेतृत्व काँग्रेसच्या बाहेरील व्यक्तीकडे दिलं पाहिजे. शरद पवार (Sharad Pawar) हे अशी क्षमता असलेले नेते आहेत, असे पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. दरम्यान दिल्लीतील काही लोक युपीए-2 (UPA-2) स्थापन करण्याच्या तयारीत असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला आहे. यावेळी त्यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांनाही चांगलंच सुनावलं आहे.

"शरद पवार या देशाचे नेते आहेत. शरद पवार, उद्धव ठाकरे काय आहेत हे सर्वांना माहिती आहे. युपीएसंबंधी बोलण्यासाठी युपीएमध्ये असायला पाहिजे असं काही नाही. युपीए राज्याचा विषय नाही, त्यामुळे राज्यातील, जिल्हा स्तरावरील लोकांनी केंद्रीय विषयावर बोलू नये. हा राष्ट्रीय विषय असून राष्ट्राच्या हितासाठी या देशात एका मजबूत विरोधी पक्षाची आघाडी स्थापन व्हायची असेल तर मी सांगितलेल्या भूमिकांवर चर्चा होणं गरजेचं आहे. हे जर महाराष्ट्रातील नेत्यांना कळत नसेल तर त्यांनी राजकीय अभ्यास करणं गरजेचं आहे". असेही ते यावेळी म्हणाले.हेदेखील वाचा- 'युपीएच्या अध्यक्षा आदरणीय सोनियाजी गांधी आहेत आणि त्याच राहतील', राजीव सातव यांचे संजय राऊतांना उत्तर

"हा दिल्लीतील चर्चेचा विषय असून महाराष्ट्र किंवा इतर राज्यांमध्ये ती होऊ नये. राष्ट्रीय विषय दिल्लीत चर्चिला जातो आणि तिथेच झाली पाहिजे. या विषयावर सोनिया गांधी, राहुल गांधी बोलणार असतील तर आम्ही त्यांना उत्तर देऊ. पण ते सुद्धा या विषयावर काही बोलत नसून चिंतन करत आहेत" असे संजय राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले.

सध्या महाराष्ट्रात काही नाजूक प्रश्न आहेत.काँग्रेस पक्ष राज्यात समजूतदारपणाने प्रश्न सोडवण्यासाठी सहकार्य करत आहे. युपीएच्या अध्यक्षा आदरणीय सोनियाजी गांधी आहेत आणि त्याच राहतील. बाहेरच्या मंडळींनी युपीएमध्ये प्रवेश घेतला की त्यांच्या मतांची योग्य ती दखल घेऊ.