Solapur: शहीद सुनिल काळे अनंतात विलीन, लष्करी इतमामात अंत्यसंस्कार; पुलवामा येथे दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण

वीरमरण आलेल्या या योध्यावर अंत्यसंस्कार करताना नातेवाईक, मित्रपरिवार, गावकरी आणि उपस्थित शोकाकूल झाले होते.

Sunil Kale | (Photo Credits: Facebook)

शहीद सुनिल काळे ( Shaheed Jawan Sunil Kale) यांच्यावर त्यांचे मूळ गाव पानगाव (Pangaon) (जि. सोलापूर, ता. बार्शी) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मित्रपरीवार आणि आपल्या सहकाऱ्यांमध्ये अत्यंत मनमिळावू, उमदे व्यक्तिमत्व अशी ओळख असलेले सुनिल काळे (Sunil Kale) अनंततात विलिन झाले. त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जम्मू-कश्मीर येथील पुलवामा जिल्ह्यातील बंडजू येथे दहशतवाद्यांशी लढताना सुनिल काळे शहीद झाले. वीरमरण आलेल्या या योध्यावर अंत्यसंस्कार करताना नातेवाईक, मित्रपरिवार, गावकरी आणि उपस्थित शोकाकूल झाले होते.

शहीद सुनिल काळे यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्ता भरणे, जिल्हाधिकारी तसेच लष्कर आणि महाराष्ट्र पोलिसांतील अधिकारी उपस्थित होते. प्राप्त माहितीनुसार, जम्मू कश्मीर येथील पुलवामा जिल्ह्यातील बंदजू परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली. सुरक्षा दल आणि पोलिसांनी संयुक्तरित्या शोधमोहीम सुरु केली. या शोधमोहीमेत पानगावचे सुपूत्र सुनिल काळे यांचाही समावेश होता. (हेही वाचा, Jammu Kashmir: पुलवामा येथे चकमकीत 2 दहशतवादी ठार; एक CRPF जवान शहीद)

दरम्यान, दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार करण्यास सुरुवात केली या वेळी दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देताना सीआरपीएफ जवान सुनिल काळे यांना वीरमरण आले. मंगळवारी (23 जून 2020) सकाळी ४.३० वाजता झालेल्या चकमकीत सुनिल काळे शहीद झाले. या वृत्तानंतर कुटुंबियासह पानगाववर दुखाचा डोंगर कोसळला.

शहीद सुनिल काळे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी पानगाव आणि संपूर्ण बार्शी तालुक्यातून नागरिक दाखल झाले होते. सध्या कोरोना व्हायरस संकट आहे. त्यामुळे योग्य ती काळजी घेत सोशल डिस्टन्सिंग पाळत नागरिकांनी शहीद सुनिल काळे यांना अखेरचा निरोप दिला.