सोलापूर: पीकाला हमीभाव नसल्याचं सांगत शेतकर्‍याने जिल्हाधिकार्‍याकडे मागितली गांजा शेती ची परवानगी; पोलिसांनी म्हटलं 'पब्लिसिटी स्टंट'

मोहोळ पोलिस स्टेशनचे सिनियर इन्सपेक्टर अशोक सायकर यांनी हा सारा केवळ ' पब्लिसिटी स्टंट' असल्याचं म्हटलं आहे

Ganja | PC: IANS

सोलापूर (Solapur)  मध्ये एका शेतकर्‍याने चक्क प्रशासनाकडे गांजाची शेती (Ganja Cultivation) करण्याची परवानगी द्या अशी मागणी केली आहे. शेती करून सध्या पिकाला कवडीमोल भाव मिळत आहे. हमीभाव (MSP) नसल्याने नुकसान होत असल्याचं सांगत जिल्हाधिकार्‍याकडे पत्राद्वारा गांजाची शेती करण्याची परवानगी मागितली आहे. दरम्यान जिल्हाधिकार्‍याने शेतकर्‍याचे पत्र पोलिसांकडे वर्ग केले असून त्यांनी हा प्रकार ' पब्लिसिटी स्टंट' असल्याचं म्हटलं आहे.

एनपीएस अ‍ॅक्ट नुसार, भारतामध्ये गांज्याची शेती करण्याला परवानगी नाही. सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील गांजा शेतीची परवानगी मागणार्‍या या शेतकर्‍याचं नाव अनिल पाटील आहे. त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना लिहलेल्या पत्रात,' शेतीमध्ये शासनाचा पिकाला हमीभाव नाही. त्यामुळे शेती व्यवसाय तोट्यामध्ये जात आहे. मशागतीसाठी केलेला खर्च देखील निघत नाही. ऊस जर गळपासाठी साखर कारखान्याला दिला तर बिल देखील लवकर मिळत नाही' असे नमूद केले आहे. (नक्की वाचा: धक्कादायक! उत्तर प्रदेशातील एकाच कुटूंबातील 6 जणांनी मेथी समजून खाल्ली 'गांजाची भाजी'; तातडीने केले रुग्णालयात दाखल).

गांजाला चांगला बाजारभाव आहे. त्यामुळे पाटील यांच्या 2एकर शेतामध्ये गांजा पिकवायला परवानगी द्या अशी मागणी शेतकर्‍याने केली आहे. 15 सप्टेंबर पर्यंत उत्तर द्या अन्यथा 16 सप्टेंबर पासून शासनाने परवानगी दिली असं समजून शेती सुरू केली जाईल असे त्यांने लिहले आहे. जर गांजा शेती केली म्हणून काही कारवाई केली तर त्याला प्रशासन जबाबदार असेल असा धमकी वजा इशारा देखील पत्रात देण्यात आला आहे.

मोहोळ पोलिस स्टेशनचे सिनियर इन्सपेक्टर अशोक सायकर यांनी हा सारा केवळ ' पब्लिसिटी स्टंट' असल्याचं म्हटलं आहे. त्याने खरंच गांजा शेती केली तर आम्ही गुन्हा दाखल करू असेदेखील पोलिस म्हणाले आहेत.