Delta Plus Cases In Maharashtra: महाराष्ट्रात आतापर्यंत 66 जणांना डेल्टा व्हायरसची लागण, तर 5 जणांचा मृत्यू

या 66 रुग्णांपैकी काहींनी लसीचे दोन्ही डोस घेतले होते.

Coronavirus | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना व्हायरसचा (Corona Virus) संसर्ग अद्यापही कायम असताना आता डेल्टा व्हायरस (Delta virus) नव्याने डोकं वर काढत आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या डेल्टा प्लस प्रकाराने संक्रमित (posotive) झालेले 66 रुग्ण सापडले असून त्यातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या 66 रुग्णांपैकी काहींनी लसीचे दोन्ही डोस घेतले होते. राज्याच्या विविध भागातून घेतलेल्या नमुन्यांच्या जीनोम सिक्वेंसींग (Genome sequencing) तपासात ही प्रकरणे आली आहेत.  रत्नागिरी, रायगड आणि बीडमध्ये शुक्रवारी डेल्टा प्लस प्रकारातून प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत डेल्टा प्लस (Delta Plus) प्रकारामुळे रत्नागिरीमध्ये दोन, मुंबई, रायगड आणि बीडमध्ये प्रत्येकी एक रुग्ण दगावला आहे.  मृतांमध्ये तीन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. सर्व 65 वर्षांपेक्षा जास्त वयाचे होते आणि अनेक आजारांनी ग्रस्त होते. मृतांपैकी दोघांना कोरोना विषाणूच्या लसीचे दोन्ही डोस मिळाले होते, दोघांना एक डोस मिळाला होता. त्याचबरोबर पाचव्या लसीकरणाबाबत (Vaccination) माहिती घेतली जात आहे.

गेल्या एका आठवड्यात राज्यातील डेल्टा प्लस प्रकारांचा आकडा 21 वरून 66 वर पोहोचला आहे. यातील काही प्रकरणे जून महिन्यातील आहेत. राज्य सर्विलांस अधिकारी डॉ.प्रदीप आवटे म्हणाले की घाबरण्यासारखे काहीच नाही. ज्यांना आधीच अनेक आजार आहेत, अशा प्रकरणांमध्ये डेल्टा प्लस प्रकारातील मृत्यूची प्रकरणे समोर येत आहेत. ते म्हणाले की हे समजणे महत्वाचे आहे की डेल्टा अजूनही सर्वात घातक प्रकार आहे. तो 80 टक्के प्रकरणांसाठी जबाबदार आहे आणि डेल्टा प्रकारांवर लस प्रभावी आहेत.

लोकांनी मास्क घालावे आणि सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.  त्याचवेळी कोरोना विषाणूच्या डेल्टा प्लस प्रकारामुळे झालेल्या संसर्गामुळे मुंबईत 63 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची पहिली घटना गुरुवारी समोर आली. बीएमसीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, कोरोना लसीचे दोन्ही डोस या वृद्ध महिलेला देण्यात आले होते, ज्याने विषाणूच्या या स्वरूपामुळे जुलैच्या शेवटच्या आठवड्यात आपला जीव गमावला होता.

तिच्या मृत्यूनंतर त्या महिलेच्या जवळच्या संपर्कात असलेल्या आणखी दोन लोकांनाही या विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे, अशी माहिती बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. विषाणूचा हा प्रकार अत्यंत संक्रामक आहे. डेल्टा प्लस फॉर्मची जास्तीत जास्त 13 प्रकरणे उत्तर महाराष्ट्रातील जळगावातून आली आहेत. दरम्यान 12 प्रकरणे रत्नागिरीतून आणि 11 मुंबईतून आली आहेत.