Skill Center on Wheels: उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार 'स्कील सेंटर ऑन व्हील्स'चे लोकार्पण; फिरत्या बसच्या माध्यमातून युवकांना प्राप्त होणार रोजगाराच्या संधी

स्किल ऑन व्हील्सचे उद्दिष्ट मोठ्या संख्येने तरुणांना उद्योग-संबंधित कौशल्य प्रशिक्षण घेण्यास सक्षम करणे आहे, जे त्यांच्या सैद्धांतिक तसेच व्यावहारिक ज्ञानात सुधारणा करेल आणि चांगली उपजीविका साध्य करण्यात मदत करेल.

CM Eknath Shinde | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Skill Center on Wheels: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ‘स्कील सेंटर ऑन व्हील्स’ या संकल्पनेअंतर्गत फिरत्या बसचे लोकार्पण वर्षा निवासस्थानी २६ जानेवारी २०२४ रोजी दुपारी १२ वाजता होणार आहे. यावेळी कौशल्य विकास, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांची प्रमुख उपस्थिती असेल. मुंबई उपनगर जिल्ह्यात जिल्हा नियोजन समितीमार्फत नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत स्कील सेंटर ऑन व्हील संकल्पना राबवली जाणार आहे. याद्वारे फिरत्या बसच्या माध्यमातून युवकांना कौशल्य प्रशिक्षण प्रदान करुन रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत.

जिल्ह्यातील युवकांना करिअर मार्गदर्शन देणे, त्यासाठी आवश्यक कौशल्य विकास उपक्रमाबाबत माहिती देणे, त्याचे प्रशिक्षण देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या उपक्रमामुळे वंचित घटकांचे अर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरण होण्यास मदत मिळेल.

या कार्यक्रमांतर्गत ब्युटी ॲण्ड मेकअप ट्रेड, इलेक्ट्रिकल डॉमेस्टिक अप्लायन्सेस व कंप्यूटर एज्युकेशन या व्यवसायांच्या कार्यशाळा बसमधे आयोजित करण्यात आल्या आहेत. बसच्या चालन, परिवहन, देखभाल आणि दुरुस्तीसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाबरोबर ५ वर्षांचा करार करण्यात आला आहे. राज्यातील कौशल्य विकास केंद्रांच्या माध्यमातून १५ ते ४५ वर्षे वयोगटातील गरजू युवक युवतींना गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण मिळेल. लाभार्थ्यांना त्या मिळालेल्या कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळेल, समजतील मागास घटकांना आत्मनिर्भर बनवून मुख्य प्रवाहात आणणे शक्य होईल. (हेही वाचा: Coaching Centre Guidelines: 'कोचिंग संस्थांमध्ये 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाही'; सरकारने जारी केली नवीन मार्गदर्शक तत्वे)

दरम्यान, स्किल ऑन व्हील्सचे उद्दिष्ट मोठ्या संख्येने तरुणांना उद्योग-संबंधित कौशल्य प्रशिक्षण घेण्यास सक्षम करणे आहे, जे त्यांच्या सैद्धांतिक तसेच व्यावहारिक ज्ञानात सुधारणा करेल आणि चांगली उपजीविका साध्य करण्यात मदत करेल.