मुंबई: सायन उड्डाणपूल 6-9 मार्च दरम्यान वाहतुकीसाठी बंद
त्यामुळे 6-9 मार्च दरम्यान ब्लॉक घेण्यात आला असून पूलावरील वाहतूक बंद राहील.
मुंबईतील (Mumbai) सायन उड्डाणपूलाचे (Sion Flyover Bridge) बेअरिंग बदलण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. हे काम दोन महिने चालणार असून कामादरम्यान काही ब्लॉक्स घेण्यात येतात. त्यावेळेस उड्डाणपूल वाहतूकीसाठी बंद ठेवला जातो. आज सकाळी 6 वाजल्यापासून तिसरा ब्लॉक सुरु झाला असल्याने उड्डाणपुलावरील वाहतूक पूर्णत: बंद राहील. हा ब्लॉक 9 मार्च रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत असणार आहे. त्यामुळे त्यादरम्यान प्रवाशांना वाहतूककोंडीला सामोरे जावे लागू शकते. मात्र ब्लॉक दरम्यान प्रवाशांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे मुंबई पोलिसांकडून वारंवार सांगण्यात येते.
सायन उड्डाणपूलाच्या स्ट्रक्चरल ऑडिटनंतर पुलाचे बेअरिंग बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. आयआयटी मुंबईच्या अहवालानुसार उड्डाणपुलाच्या 160 बेअरिंग बदलणे गरजेचे होते. त्यानुसार कामाला सुरुवात झाल्यानंतर पुलाच्या कामादरम्यान आठ ब्लॉक घेण्यात येणार आहेत. पहिल्या दोन टप्प्यात सायन उड्डाणपुलाचे एकूण 64 बेअरिंग यशस्वीरित्या बदलण्यात आले. (मुंबई: सायन उड्डाणपूल दुरुस्ती कामाला आजपासून सुरुवात, वाहतूकीवर होणार परिणाम)
यापूर्वी देखील पहिल्या दोन टप्प्यातील ब्लॉक्स दरम्यान प्रवाशांना वाहतुककोंडीचा सामना करावा लागला होता. मात्र ब्लॉक दरम्यान पर्यायी मार्गांचा वापर करणे अधिक सोईस्कर ठरेल. यापुढील ब्लॉक्स 12 ते 16 मार्च, 19 ते 23 मार्च, 26 ते 30 मार्च आणि 2 ते 6 एप्रिल या दरम्यान घेतले जातील. सायन उड्डाणपुलाचे काम होईपर्यंत प्रवाशांना वाहतूककोंडीला सामारे जावे लागत असले तरी एप्रिल महिन्याच्या अखेरीपर्यंत पूलाचे काम पूर्ण होईल, असा अंदाज एमएसआरडीसीने व्यक्त केला आहे.