Ketaki Mategaonkar: गायिका केतकी माटेगावकर हिच्या चुलत भावाची आत्महत्या, बेकारीला कंटाळून टोकाचे पाऊल
अक्षय हा प्रसिद्ध गायिका केतकी माटेगावकर (Ketaki Mategaonkar) हिचा चुलतभाऊ आहे. नोकरी लागत नसल्याने पाठिमागील काही दिवसांपासून तो नैराश्येत होता.
अक्षय माटेगावकर (Akshay Mategaonkar) नावाच्या तरुणाने वयाच्या 21 व्या वर्षी आत्महत्या केली आहे. अक्षय हा प्रसिद्ध गायिका केतकी माटेगावकर (Ketaki Mategaonkar) हिचा चुलतभाऊ आहे. नोकरी लागत नसल्याने पाठिमागील काही दिवसांपासून तो नैराश्येत होता. वास्तविक पाहता त्याचे शिक्षणही पूर्ण झाले नव्हते. सिम्बॉयसिस महाविद्यालयात कॉम्प्युटर सायन्स विभागाच्या चौथ्या वर्षात शिक्षण घेत होता. शिक्षण सुरु असतानाच तो नोकरीसाठी प्रयत्न करत होता. त्यात त्याला काही प्रयत्नांमध्ये अपयश आल्याने आपण बेकार असल्याची भावना त्याच्या मनात वाढीस लागली होती. अखेर त्याने आत्महत्या केली.
अक्षय हा सुशिक्षीत आणि उच्चभ्रू कुटुंबातून येतो. त्याचे आईवडील दोघेही चांल्या पदाच्या नोकरीवर आहेत. अक्षयची आई मीनल माटेगावकर या मुंबईतील एका कॉलेजमध्ये प्राध्यापिका आहेत. तर, वडील अमोल माटेगावकर हे मेकॅनिकल इंजिनिअर आहेत. ते सध्या एका नामांकीत कंपनीत चांगल्या पदावर नोकरी करतात. मीनल आणि अमोल यांना अक्षय आणि आकांक्षा यांच्या रुपात दोन जुळी अपत्ये जन्माला आली. दोघेही वेगवेगळ्या शिक्षणसंस्थांमध्ये चांगल्या दर्जाचे शिक्षण घेत होती. आकांक्षा माटेगावकर ही लोणी येथीलएमआयटी महाविद्यालयात डिझायनिंगच्या अंतमि वर्षात शिक्षण घेत होती. सध्या ती नांदेड सिटी येथे तिच्या चुलत्यांकडे निवासाला होती. तर सुसगाव येथील माउंट युनिक सोसायटीच्या आठव्या मजल्यावर मित्रांसमवेत राहत होता. (हेही वाचा, Pune Crime News: प्रियकर जेवायला लवकर आला नाही म्हणून केली आत्महत्या; पिंपरी-चिंचवडमधील धक्कादायक प्रकार)
अक्षयने शिक्षण सुरु असताना अनेक ठिकाणी नोकरीसाठी मुलाखती दिल्या होत्या. यापैकी कोणत्याच मुलाखतीत त्याला म्हणावे तसे यश आले नाही. त्यामुळे तो खचून गेला होता. आपल्याला नोकरी लागणार नाही याची चिंता त्याला सतत सतावत असे. त्यातून तो नैराश्येत गेला होता. त्याने एका आयटी कंपनीत इंटर्नशिप नुकतीच केली होती. तरीही तो सातत्याने चिंताक्रांत होता. अखेर त्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने लिहीलेल्या चिठ्ठीतही आपण आत्महत्या करत असल्याचे नमुद केले आहे. सुसगाव येथे मित्रांसोबत राहात असलेल्या माउंट युनिक सोसायटीच्या आठव्या मजल्यावरुन खाली उडी मारत त्याने आत्महत्या केली.
आई-बाबा मला माफ करा
अक्षयने आई-वडील आणि बहिणीला उद्देशून लिहीलेल्या सुसाईड नोटमध्ये त्याने म्हटले आहे, मी लिहीतोय ही शेवटची गोष्ट असेल. माझ्याकडून असलेल्या तुमच्या अपेक्षा मी पूर्ण करु शकलो नाही. त्याबद्दल मी माफी मागतो. खरोखरच खूप प्रयत्न केले मी. पण मला ते नाही जमले. मी इंटर्नशिपही केली. त्यातही मी चांगली कामगिरी करण्याचा खूप प्रयत्न केला. तिथेही मला यश आले नाही. हे सगळे पाहिल्यावर माझ्या लक्षा आले की, मी नोकरी मिळवू शकत नाही. हे तुम्हाला सांगण्याचे माझ्यात धाडस नाही. आता माझ्याकडे दुसरा पर्यायही नाही. आई - बाबा आणि आकांक्षा, मला माफ करा. मी निघालो.
तुमचा, अक्षय माटेगावकर
माटेगावकर कुटुंबीय आपापल्या क्षेत्रात व्यग्र असतात. सर्व काही ठिक चालले असताना अक्षयने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. त्यामुळे कुटुंबीय आणि निकटवर्तीयांना मोठा धक्का बसला आहे. हिंजवडी पोलिसांनी घटनेची नोंद घेतली आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.