Silver Oak Attack: गुणरत्न सदावर्ते यांचा सहकारी संदीप गोडबोले यास दोन दिवसांची पलीस कोठडी, सिल्वर ओक हल्ला प्रकरण
या हल्ल्याचा सूत्रधार असल्याचा ठपका ठेवत अॅड गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांना अटक झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे मुंबईतील निवासस्थान 'सिल्वर ओक'वर झालेल्या हल्ला प्रकरणी मुंबई पोलीस जोरदार कार्यरत झाले आहे. या हल्ल्याचा सूत्रधार असल्याचा ठपका ठेवत अॅड गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांना अटक झाली आहे. सध्या ते सातारा पोलिसांच्या ताब्यात आहेत. दरम्यान, सदावर्ते यांचा सहकारी संदीप गिरीधर गोडबोले (Sandeep Godbole ) या इसमासही अटक झाली आहे. मुंबई पोलिसांकडून गोडबोले याला न्यायालयात गुरुवारी (14 एप्रिल) हजर केले असता त्याला शनिवारपर्यंत (16 एप्रिल) पोलिस कोठडी (Police Custody) सुनावण्यात आली आहे.
सिल्वर ओकवर हल्ला झाला त्या दिवशी एसटी कर्मचारी म्हणवणारे अनेक आंदोल आक्रमकपणे घटनास्थळी दाखल झाले होते. या ठिकाणी या आक्रमक आंदोलकांनी चपला आणि दगडही भिरकावले. आंदोलनकर्त्यांचे हे उत्स्फुर्त आंदोलन नव्हते तर हा नियोजनबद्ध कट असल्याचे पोलिसांचे म्हणने आहे. पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासात घटना घडली त्या दिवशी सकाळी साडेदहा व दुपारी दीड वाजता ॲड. सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांना नागपुरातून दोन व्हॉट्सॲप कॉल आल्याचे पुढे आले आहे. त्याच आधारावर मुंबई पोलिसांनी नागपूर पोलिसांशी संपर्क साधत गोडबोले यास अटक केली आहे. गोडबोले हा प्रादेशिक परिवहन विभागाच्या यांत्रिकी विभागात कर्तव्यास आहे. (हेही वाचा, Gunratna Sadavarte सातारा पोलिसांच्या ताब्यात; छत्रपती उदयनराजे भोसले, संभाजीराजे यांच्याविरोधातील आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल गुन्हा होता दाखल)
मुंबई पोलिसांच्या एका पथकाने नागपूरातील गणेशपेठ येथून कारवाई करत संदीप गोडबोले याला ताब्यात घेतले. संदीपला ताब्यात घेऊन पोलीस मुंबईला रवाना झाले. पोलिसांनी त्याला कोर्टात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. संदीप गोडबोले हा गुणरत्न सदावर्ते यांच्या थेट संपर्कात होता असेही प्रसारमाध्यमानी सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे. सरकारी वकील प्रदीप घरत यांनी गोडबोले याच्या पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ही मागणी मान्य करत गोडबोले यास कोठडी सुनावली.