धक्कादायक! मुंबईच्या मालाड परिसरात 70 कोरोना व्हायरस रुग्ण बेपत्ता; शोधकार्यासाठी BMC ने मागितली पोलिसांकडे मदत
राज्यात मुंबई (Mumbai)) येथे मोठ्या प्रमाणात कोरोनाची नवीन प्रकरणे समोर येत आहेत.
देशात कोरोना व्हायरस (Coronavirus) रुग्णांच्या संख्येत महाराष्ट्राचा (Maharashtra) पहिला क्रमांक आहे व सध्या राज्यातील परिस्थिती चिंताजनक आहे. राज्यात मुंबई (Mumbai)) येथे मोठ्या प्रमाणात कोरोनाची नवीन प्रकरणे समोर येत आहेत. आता मंगळवारी मुंबई पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. कोविड-19 ची लागण झालेले 70 लोक बेपत्ता असल्याची नोंद, मुंबईच्या पी-उत्तर प्रभागातून म्हणजेच मालाड (Malad) येथून झाली असल्याची माहिती मुंबई पोलिस प्रवक्ते डीसीपी प्रणय अशोक यांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या रुग्णांना शोधण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) त्यांची मदत घेतली आहे.
गेल्या 3 महिन्यांत हे सर्व 70 लोक बेपत्ता झाले असल्याची माहिती, बीएमसीने मुंबई पोलिसांना दिली आहे. या सर्वांचा कोविड-19 चा अहवाल मुंबईच्या पी-उत्तर वॉर्डात सकारात्मक आला आहे. हा अहवाल सकारात्मक आल्यानंतरच हे सर्व रुग्ण बेपत्ता झाले आहेत. या सर्व लोकांचे मोबाईल लोकेशन व सीडीआरच्या माध्यमातून त्यांचा शोध घेण्यासाठी बीएमसीने मुंबई पोलिसांची मदत घेतली आहे. रुग्णांचे अहवाल सकारात्मक आल्यानंतर, बेड्सच्या कमतरतेमुळे बीएमसी अधिकाऱ्यांना रुग्णांची भेट घेण्यास थोडा उशीर झाला, या काळात हे रुग्ण बेपत्ता झाले. (हेही वाचा: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; नवी मुंबई, उल्हासनगर व मीरा भाईंदर मनपा आयुक्तांची तडकाफडकी बदली)
यातील अनेक लोकांचा सकारात्मक अहवाल प्राप्त होण्यापूर्वीच हे बेपत्ता झाले आहेत. तपासणी केली असता यातील काही लोकांच्या घराला कुलूप आढळले तर काही लोकांचे पत्ते चुकीचे होते. याता याचीही शक्यता वर्तवली जात आहे की, यातील काही लोकांचा मृत्यू झाला असावा. याबाबत बोलताना मनपा आयुक्त इकबाल चहल म्हणाले, ‘रुग्णांच्या मोबाइल फोन लोकेशनवरून त्यांचा शोध घेण्याबाबत आम्ही पोलिस प्रमुखांशी बोललो आहे. जेणेकरून आम्ही त्यांची स्थिती जाणून घेऊ आणि त्यानुसार आमच्या नोंदी अद्ययावत करू. सकारात्मक चाचणी आल्याने अशा रुग्णांनी इतरांनाही धोक्यात आणले आहे. अन्य प्रभागांतही आम्ही अशा प्रकारची प्रकरणे शोधात आहोत.’