इंदापूर: शिवशाही बसने 3 वर्षाच्या चिमुकलीला चिरडले; वाहनचालकावर गुन्हा दाखल

ही घटना पुणे सोलापूर महामार्गावरील (Pune Solapur Highway) इंदापूरजवळील (Indapur) लोणी देवकर उड्डाणपुलावर मंगळवारी सकाळी 8.30 वाजताच्या सुमारास घडली.

Image used for representational purpose | (Photo Credit: ANI)

शिवशाही बसने एका तीन वर्षाच्या चिमुकलीला चिरडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना पुणे सोलापूर महामार्गावरील (Pune Solapur Highway) इंदापूरजवळील (Indapur) लोणी देवकर उड्डाणपुलावर मंगळवारी सकाळी 8.30 वाजताच्या सुमारास घडली. या अपघात प्रकरणी बस चालकालवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मात्र, या अपघातानंतर संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी महामार्गावर रास्तारोको केला. यामुळे संबधित भागात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान, स्थानिक पोलिसांनी ग्रामस्थांची समजूत काढून वाहतूक सुरळीत केली आहे.

रिया प्रेमकुमार गौतम असे अपघातात मृत्यू झालेल्या चिमुरडीचे नाव आहे. लोणी देवकर येथील 'एमआयडीसी'त मजुरी करणाऱ्या परप्रांतीय कुटुंबाची रिया एकुलती एक मुलगी होती. मंगळवारी सकाळी 8 वाजताच्या सुमारास रिया ही रस्ता ओलंडताना शिवशाही बसच्या धडकेत तिचा जागीच मृत्यू झाला. यावर संतापलेल्या नागरीकांनी रास्तारोको केला. त्यामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. परंतु, इंदापूरचे पोलिस निरीक्षक मधुकर पवार, महामार्ग पोलिस केंद्राचे सहायक पोलिस निरीक्षक, अभिजीत अभंग यांनी स्थानिकांची समजूत काढल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. हे देखील वाचा- धक्कादायक! नेपाळच्या रिसॉर्टमध्ये सापडले 8 भारतीय पर्यटकांचे मृतदेह

लोणी देवकर येथे सर्व प्रकारच्या एसटीसाठी 'बस थांबा' मंजूर आहे. महाविकास समन्वय समिती टोल कंपनीने दोन्ही बाजूंना बस थांब्याची सोय केली आहे. मात्र, एकही एसटी येथे थांबत नाही. गावातून उड्डाणपुलावरून सर्व बस सुसाट वेगाने जातात. यामुळे बस थांबे ओस पडले आहेत. परिणामी, लोकांना उड्डाणपुलावर चढून जावे लागते. यामुळे येथे अनेक अपघात घडतात, असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.