शिवसेना आमदार नीलम गोऱ्हे यांच्याकडून तुळशीबाग राम मंदिरात महाआरती

पुण्यातल्या तुळशीबागेतील राम मंदिरातही शिवसेना आमदार नीलम गोऱ्हे यांनी आरती केली आणि श्रीराम नावाच्या पेढ्यांचा प्रसाद चढवला

नीलम गोऱ्हे (Photo credit : youtube)

'पहिल्यांदा मंदिर त्यानंतर सरकार' अशी घोषणा देऊन सेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्याकडे कूच केले. याच पार्श्वभूमीवर राज्यातील ठीकठिकाणी शिवसैनिकांनी रामाची आरती केली. पुण्यातल्या तुळशीबागेतील राम मंदिरातही शिवसेना आमदार नीलम गोऱ्हे यांनी आरती केली आणि श्रीराम नावाच्या पेढ्यांचा प्रसाद चढवला. यावेळी शिवसेनेचे आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी निलम गोऱ्हे म्हणाल्या, ‘केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून कोणत्याही आश्वासनची पूर्तता करण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. राम मंदिराचा निर्णय देखील त्यांनी अद्याप पर्यंत घेतलेला नाही. याची जाणीव सरकारला करुन देण्यासाठी उद्धव ठाकरे अयोध्येला रवाना झाले आहेत.’ दरम्यान, राम मंदिर लवकर होऊ दे अशी प्रार्थना आपण आरतीदरम्यान केल्याचे त्यांनी सांगितले.

शिवसेनेच्या अयोध्या कार्यक्रमावर आणि उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर महाराष्ट्र निवनिर्माण सेनेने (मनसे) टीका केली आहे. यासंदर्भात मुंबईतील शिवसेना भवन परिसरात मनसेकडून पोस्टरद्वारे शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अयोध्येला निघालो जोशात…राजीनामे मात्र अजूनही खिशात….अशा आशयाचे पोस्टर मनसेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या शिवाजी पार्क येथील मुख्यालयाच्या समोरचा लावली आहेत.