Shivrajyabhishek Sohala 2023: छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेकाच्या स्मरणार्थ सरकार जारी करणार विशेष टपाल तिकीट
शिवराज्याभिषेकाचे महत्व अधिक ठळकपणे अधोरेखित करण्याचा राज्य शासनाचा विचार असून राजमाता माँ जिजाऊ यांची यामागील भावना, संकल्पना लोकांपर्यंत पोहोचण्याचा यामागील उद्देश आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षानिमित्त (Shivrajyabhishek Sohala 2023 ) सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून राज्यात वर्षभर विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वाला मानवंदना देण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र शासनाने भारतीय टपाल विभागाच्या सहकार्याने एक टपाल तिकीट काढण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या मंगळवारी,6 जून रोजी राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते राजभवन येथील दरबार हॉलमध्ये समारंभपूर्वक या तिकिटाचे अनावरण होणार आहे.
‘छत्रपती शिवाजी महाराज‘ हा शब्द चेतनेचा संचार करणारा प्रेरणामंत्र आहे. कित्येक राष्ट्रनायकांना लढण्याची आणि विजयाची प्रेरणा देणारे अद्वितीय व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असून त्यांचा विचार जगभरात जनाजनांत आणि मनामनांत पोहोचविण्याचा दृढ निश्चय राज्य शासनाने केला आहे. याचाच एक भाग म्हणून महाराजांवरील पोस्ट तिकीट प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला असल्याचे मंत्री मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. टपाल तिकीट अनावरणानंतर सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने ‘शिववंदना’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शिवराज्याभिषेकाचे महत्व अधिक ठळकपणे अधोरेखित करण्याचा राज्य शासनाचा विचार असून राजमाता माँ जिजाऊ यांची यामागील भावना, संकल्पना लोकांपर्यंत पोहोचण्याचा यामागील उद्देश आहे. महाराजांच्या काळांतील नाणी, गडकिल्ले, अष्टप्रधान मंडळ प्रत्येक गोष्ट ही प्रेरणादायी आहे; या प्रेरक गोष्टी सर्वांपर्यंत सहजपणे पोहोचविण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त महाराजांचे विचार, कार्यपद्धती आणि योगदान भावी पिढीपर्यंत पोहोचावे यासाठी सांस्कृतिक कार्य विभागामार्फत राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.