शिवभोजन योजना राज्यभरात 26 जानेवारीपासून होणार सुरु; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रशासनास निर्देश

महाराष्ट्रात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर शिवभोजन योजना (Shivbhojan Yojana) लवकरच सुरु होईल, असे अपेक्षित होते.

Uddhav Thakrey (Photo Credit: Twitter)

महाराष्ट्र (Maharashtra) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील गरिब आणि गरजू लोकांना 10 रुपयांत जेवण मिळणार, असे शिवसेनेने त्यांच्या वचननाम्यात म्हटले होते. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर शिवभोजन योजना (Shivbhojan Yojana) लवकरच सुरु होईल, असे अपेक्षित होते. त्यानंतर गेल्या महिन्याच्या अखेरिस मंत्रिमंडळाकडून शिवभोजन योजनेला मान्यता देण्यात आली आहे. यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या योजनेचा आज आढावा घेतला असून योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनास निर्देश दिले आहेत.

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री ठाकरे यांनी शिवभोजन योजनेची घोषणा केली होती. त्यानंतर गेल्या महिन्याच्या अखेरीस मंत्रिमंडळाने शिवभोजन योजनेला मान्यता दिली होती. यासाठी तीन महिन्यांत 6 कोटी 48 लाख रुपये खर्च अपेक्षित होता. सुरुवातील केवळ 50 ठिकामी शिवभोजन योजना अंतर्गत 10 रुपयात जेवणाची थाळी देण्यात येणार होती. परंतु, ही योजना संपूर्ण राज्यभरात सुरु करण्यात यावी, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. यासंदर्भात मुख्यमंत्री कार्यलयाच्या अधिकृत ट्वीटर खात्यावर माहिती देण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी #शिवभोजन योजनेचा घेतला आढावा. 26 जानेवारीपासून योजनेची राज्यभर अंमलबजावणी सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश असा मजकूर संबंधित ट्विटमध्ये लिहिण्यात आला आहे.

मुख्यमंत्री कार्यलायाचे ट्विट- 

 

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारची शिवभोजन योजना ही अटी-शर्तींमुळे विरोधकांच्या रडारवर आली होती. शिवभोजन योजनेतील अटी बघूनच भूक मरेल. या योजनेचे नाव बदलून अटीभोजन करा, अशी टीका माजी खासदार नीलेश राणे यांनी केली होती.