Shiv Sena On BJP: 'तर तो एक राजकीय स्वप्नदोषच', भाजपच्या राजकीय वर्तनावर शिवसेनेची टोलेबाजी

मोदी-ठाकरे भेटीत महाराष्ट्रातील सत्तापरिवर्तनाचीच बातचित झाली व आता दोन-पाच दिवसांत पुन्हा एकदा राजभवनात पहाटेची लगबग सुरू होईल असे स्वप्न कुणाला पडत असेल तर तो एक राजकीय स्वप्नदोषच म्हणावा लागेल,' अशी टोलेबाजी दैनिक सामना संपादकीयातून करण्यात आली आहे.

Devendra Fadnavis | (Photo Credits: twitter)

राज्यातील महाविकासआघाडी सरकार येत्या काही दिवसात पडेल असे सांगता सांगता हे सरकार आपल्याच ओझ्याने पडेल असे भाजप (BJP) नेते सांगू लागले आहेत. त्यावरुन शिवसेना (Shiv Sena) मुखपत्र दैनिक सामना ( Dainik Saamna) संपादकीयातून जोरदार खिल्ली उडवत टीका करण्यात आली आहे. सामना संपादकीयातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्या वेगवेगळ्या झालेल्या भेटी, त्यावरुन रंगलेल्या चर्चा, भाजप सातत्याने करत असलेले आरोप, टीका यांवरुन सामना संपादकीयात जोरदार टोलेबाजी करण्यात आली आहे. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्यात झालेल्या भेटीवरून सामनात म्हटले आहे की, 'उद्धव ठाकरे हे मध्यंतरी दिल्लीत जाऊन पंतप्रधान मोदींना भेटले. मोदी-ठाकरे भेटीत महाराष्ट्रातील सत्तापरिवर्तनाचीच बातचित झाली व आता दोन-पाच दिवसांत पुन्हा एकदा राजभवनात पहाटेची लगबग सुरू होईल असे स्वप्न कुणाला पडत असेल तर तो एक राजकीय स्वप्नदोषच म्हणावा लागेल.'

काय म्हटले आहे सामनात?

मागे ‘ईडी’ने भलत्याच प्रकरणी पवार यांना नोटीस बजावली. तेव्हा पवार रस्त्यावर उतरून ‘ईडी’ कार्यालयाकडे जायला निघाले. महाराष्ट्राचे वातावरण तेव्हा ढवळून निघाले होते. ईडी, सीबीआय किंवा आपले महामहीम राज्यपाल महोदय यांचा वापर करून राज्यातील सरकार अस्थिर होईल हा भ्रमाचा भोपळाच आहे.