Shiv Sena: उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय; एकनाथ शिंदे यांना शिवसेना नेतेपदावरून हटवले

‘शिवसेना पक्षप्रमुख म्हणून माझ्याकडे असलेल्या अधिकारांचा वापर करून, मी एकनाथ शिंदे यांना पक्ष संघटनेतील शिवसेना नेतेपदावरून काढून टाकतो,‘ असे उद्धव ठाकरे यांच्या स्वाक्षरीच्या पत्रात म्हटले आहे.

Uddhav Thackeray | (Photo Credit: Twitter)

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेविरुद्ध (Shiv Sena) केलेले बंड अखेर यशस्वी ठरले आणि भाजपच्या साथीने त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र लढाई अजूनही संपली नाही. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये ‘शिवसेना’ पक्ष, शिवसेनेचे नाव यावरून वाद सुरु झाला आहे. अशात आज उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पक्ष संघटनेतील शिवसेना नेतेपदावरून हकालपट्टी केली. पक्षाने जारी केलेल्या पत्रात उद्धव ठाकरे म्हणाले की, श्री. शिंदे ‘पक्षविरोधी कारवायांमध्ये’ गुंतले आहेत आणि त्यांनी स्वेच्छेने त्यांचे सदस्यत्व सोडले आहे.

‘शिवसेना पक्षप्रमुख म्हणून माझ्याकडे असलेल्या अधिकारांचा वापर करून, मी एकनाथ शिंदे यांना पक्ष संघटनेतील शिवसेना नेतेपदावरून काढून टाकतो,‘ असे उद्धव ठाकरे यांच्या स्वाक्षरीच्या पत्रात म्हटले आहे. एकनाथ शिंदे यांनी दावा केला आहे की, ते शिवसेनेचे नेते आहेत आणि आता ठाकरे कॅम्प अल्पमतात आले आहे. परंतु शिंदे यांनी कधीही स्वतःला पक्षप्रमुख म्हटले नाही, ठाकरे तांत्रिकदृष्ट्या अजूनही पक्षप्रमुख आहेत.

याआधी श्री. शिंदे यांच्याकडून आपण शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे राजकीय वारसदार असल्याच्या आशयाचा एक संदेश आला होता. त्यांनी आपल्या ट्विटर हँडलचे प्रोफाईल पिक्चर बदलून, बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचा फोटो जोडला आहे. शिंदे गटाकडे शिवसेनेच्या जास्तीत जास्त आमदारांचा पाठींबा असल्याने तेच खरे शिवसेना असल्याचे सर्वोच्च न्यायालयात सांगितले आहे. (हेही वाचा: पावसाळ्यामधील आपत्तींना तोंड देण्यासाठी एकनाथ शिंदे सरकार सज्ज; अधिकाऱ्यांसोबत पार पडली बैठक)

दरम्यान, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेससोबत युती करून उद्धव ठाकरे यांनी त्यांचे वडील बाळ ठाकरे यांची हिंदुत्व विचारसरणी सोडली, असा युक्तिवाद करून त्यांनी या युतीला ‘अनैसर्गिक युती’ म्हटले होते. उद्धव ठाकरेंवर थेट हल्ला करताना, बंडखोर सेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी यापूर्वी सांगितले होते की, श्री ठाकरे यांनी त्यांच्या स्वतःच्या पक्षाचे 52 आमदार तसेच त्यांचे अधिकृत निवासस्थान सोडले आहे, परंतु ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना सोडण्यास तयार नाहीत.