Shiv Sena Symbol Hearing: धनुष्यबाण नेमका कुणाचा? निवडणूक आयोगाकडून सोमवारी दोन्ही गटांना लेखी उत्तर सादर करण्याचे आदेश; पुढील सुनावणी 30 जानेवारीला
आज सुमारे 4 तास चाललेल्या या सुनावणीनंतरही शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह ठाकरे गटाला मिळणार की, शिंदे गटाला मिळणार? या प्रश्नाचं उत्तर आजही मिळालं नाही.
Shiv Sena Symbol Hearing: धनुष्यबाण नेमका कुणाचा? या संपूर्ण महाराष्ट्राला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर आजही मिळालेलं नाही. धनुष्यबाण (Dhanushyaban) नेमकी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा की एकनाथ शिंदेंचा (Eknath Shinde) याचा अंतिम फैसला आता 30 जानेवारीला होणार आहे. निवडणूक आयोगाने सोमवारी दोन्ही गटांना लेखी उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत. निवडणूक आयोग आता शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह यावर 30 जानेवारील अंतिम निर्णय देणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आज शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या वकिलांचा युक्तीवाद पूर्ण झाला. यानंतर निवडणूक आयोगाने दोनही गटांना सोमवारी लेखी उत्तर देण्यास सांगितलं आहे. सोमवारी लेखी उत्तर आल्यावर निवडणूक आयोग निकालाची तारीख देणार आहे. आज ठाकरे गटाच्यावतीने कपिल सिब्बल, देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला. तसेच महेश जेठमलानी, मनिंदर सिंह यांनी शिंदे गटाच्यावतीने युक्तीवाद केला. (हेही वाचा -Maharashtra Government: स्वित्झर्लंडला जाऊन सामंजस्य करार करण्याची काय गरज होती ? अतुल लोंढेंचा सरकारला सवाल)
दरम्यान, आज सुमारे 4 तास चाललेल्या या सुनावणीनंतरही शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह ठाकरे गटाला मिळणार की, शिंदे गटाला मिळणार? या प्रश्नाचं उत्तर आजही मिळालं नाही. सुनावणीदरम्यान, ठाकरे आणि शिंदे गटाच्या वकिलांमध्ये शाब्दिक चकमक झाली. ठाकरे गटाचे देवदत्त कामत आणि शिंदे गटाचे महेश जेठमलानी यांच्यात शाब्दिक चकमक झाल्यानंतर आयोगाला मध्यस्थी करावी लागली.
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट पडले. दोन्ही गटांनी शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हावर दावा केला आहे. याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आज सुनावणी झाली. निवडणूक आयोगाने मुंबईतील अंधेरी पोटनिवडणुकीदरम्यान ठाकरे गटाला पेटती मशाल तर शिंदे गटाला ढाल तलवार चिन्ह दिलं होतं. तसेच उद्धव ठाकरे यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव दिले. तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव दिले आहे.