Shiv Sena on Congress: काँग्रेस पक्ष हिंमतबाज कार्यकर्ते निर्माण करण्याची फॅक्टरी आहे काय? शिवसेनेचा सवाल
महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारमध्ये सहभागी असलेल्या काँग्रेस (Congress) या आपल्या मित्रपक्षाला शिवसेना (Shiv Sena) मुखपत्र दैनिक सामना संपादकीयातून (Daily Saamana Editorial) सल्ला देण्यात आला आहे. त्यासोबतच काँग्रेस (Congress) पक्षाने अलिकडे घेतलेल्या आक्रमक भूमिकेवरुनही सवाल उपस्थित केला आहे.
महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारमध्ये सहभागी असलेल्या काँग्रेस (Congress) या आपल्या मित्रपक्षाला शिवसेना (Shiv Sena) मुखपत्र दैनिक सामना संपादकीयातून (Daily Saamana Editorial) सल्ला देण्यात आला आहे. त्यासोबतच काँग्रेस (Congress) पक्षाने अलिकडे घेतलेल्या आक्रमक भूमिकेवरुनही सवाल उपस्थित केला आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी जे डरपोक आहेत त्यांनी थेट पक्ष सोडावा, भाजप आणि आरएसएसमध्ये सहभागी व्हावे अशा आशयाचे थेट विधान केले. या विधानावरुन आणि काँग्रेसच्या भूमिकेवरुन सामना संपादकीयातून बरेच काही लिहिण्यात आले आहे. 'काँग्रेस पक्षात डरपोक लोकांना स्थान नाही असे राहुल म्हणतात ते बरोबर आहे, पण पक्षामधून ‘डरपोक’ जात राहिले तरी काँग्रेस पक्ष हिंमतबाज कार्यकर्ते निर्माण करण्याची फॅक्टरी आहे काय,' शिवसेनेने म्हटले आहे. शिवाय 'सत्ता असेल किंवा नसेल, पक्षासाठी झोकून देऊन काम करणारे झोकदार लोकच पक्ष आणि संघटन टिकवीत असतात. अनेक राज्यांत काँग्रेसकडे असे लोक राहिलेले नाहीत. प्रियंका गांधी शिकस्त करतील, पण कार्यकर्त्यांना ऊर्जा देणे गरजेचे आहे', असा सल्लाही शिवसेनेने दिला आहे.
'काँग्रेस पक्षातील उलाढाल' या मथळ्याखाली लिहिलेल्या लेखात सामना संपादकीयात म्हटले आहे की, 'काँग्रेस पक्षात सध्या काही उलढाली सुरू आहेत. कार्यकर्त्यांसाठी त्यातून सकारात्मक संदेश जात आहे. गेल्या काही दिवसांपासून कमलनाथ यांच्या फेऱ्या सोनियांच्या निवासस्थानी वाढल्या आहेत. कमलनाथ हे काँग्रेसचे कार्याध्यक्ष होतील, अशी वावटळ त्यामुळे उठली आहे. खरे काय ते राहुल गांधींनाच माहीत. पंजाबात नवज्योतसिंग सिद्धू यांची प्रदेश अध्यक्षपदी नेमणूक करून पक्ष संघटनेत आता इतर कोणाची दादागिरी चालणार नाही हे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर व नवज्योत यांच्यात बऱ्याच दिवसांपासून संघर्ष सुरू होता. सिद्धू हे काँग्रेस सोडतील अशी हवा होती, पण गांधींनी वेळीच हस्तक्षेप केला. काँग्रेस पक्षाच्या कमजोरीचा फायदा राज्यांतील नेते घेत आहेत. राजस्थान, पंजाब, मध्य प्रदेशात काँग्रेस किंवा गांधी कुटुंबाच्याच नावावर हे नेते निवडणुका जिंकतात, सत्तेवर येतात व सत्तेवर येताच हे सर्व ‘माझ्यामुळेच झाले’ अशी डिंग मारतात. या डिंगबाजीस पंजाबात तडा गेला आहे. सोनिया गांधींचा जो आदेश असेल तो मानू, असे कॅ. अमरिंदर यांना जाहीर करावे लागले.” (हेही वाचा, Shiv Sena On Modi Cabinet Reshuffle: केंद्रीय मंत्रीमंडळातील बरेचसे सदस्य लाटेबरोबर वाहून आलेले ओंडके: शिवसेना)
राहुल गांधी यांच्या विधानांवर भाष्य करत संपातकीयात पुढे म्हटले आहे की, “राजस्थानात अस्वस्थता आहे. मध्य प्रदेशातील सरकार हातचे गेले आहे. राहुल गांधी यांची वक्तव्ये कधी कधी जोरदार असतात. अनेकदा त्यांची चमकदार व पल्लेदार संवादफेक चर्चेचा विषय ठरते. राहुल गांधी यांनी नुकतेच कार्यकर्त्यांच्या बैठकीत सांगितले की, ‘‘डरपोक नेत्यांनी पक्षातून चालते व्हावे. आर.एस.एस.वाल्यांची काँग्रेसला गरज नाही.’’ गांधी यांनी हा हल्ला ज्योतिरादित्य शिंदे व जितीन प्रसाद यांच्यावर केला आहे. गांधी परिवाराचे निकटवर्तीय असलेले हे दोघे अचानक भाजपवासी झाले. गांधी यांच्या बोलण्यातून असे दिसते की, हे दोघे काँग्रेस पक्षातले छुपे संघवालेच होते व ते गेले ते बरेच झाले. ज्योतिरादित्य यांच्या आजी विजयाराजे म्हणजे ग्वाल्हेरच्या राजमाता. त्या जनसंघाशी संबंधित होत्या. इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीस विरोध करीत त्या सरळ तुरुंगात गेल्या. भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेत त्यांचा पुढाकार होता, पण त्यांचे पुत्र महाराजा माधवराव शिंदे व माधवरावांचे पुत्र ज्योतिरादित्य हे कधी संघ परिवाराच्या वाऱयालाही उभे राहिल्याची नोंद नाही. उलट कालच्या लोकसभा निवडणुकीत संघपरिवाराने ज्योतिरादित्य यांचा पराभव घडवून आणला, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही.”
सामना संपादकीयातील महत्त्वाचे मुद्दे
- आता ज्योतिरादित्य शिंदे हे भाजपमध्ये गेले व केंद्रीय मंत्रीही झाले. जितीन प्रसाद यांचे पुनर्वसन अद्याप व्हायचे आहे, पण हे दोघेही ‘डरपोक’ तसेच छुपे संघवाले असल्याचा हल्ला राहुल गांधी यांनी केला आहे. गांधी यांनी हा आरोप केला म्हणजे त्यांच्या हाती त्याबाबत पुरावे असणारच. काँग्रेस पक्षात संघवाले घुसले आहेत असा एकंदरीत गांधी यांचा सूर आहे. स्वातंत्र्यलढय़ात काँग्रेसचे योगदान मोठेच आहे. निर्भयपणे काँग्रेसचे पुढारी स्वातंत्र्य आंदोलनात उतरले. इंग्रजांशी झुंज दिली. गांधी, नेहरू, सरदार पटेल, राजेंद्र प्रसाद, लालबहादूर शास्त्री असे असंख्य काँग्रेस पुढारी तुरुंगात गेले. अनेक काँग्रेसवाल्यांनी छातीवर गोळय़ाही झेलल्या हे सत्य आहेच. असे धाडस स्वातंत्र्य चळवळीत संघ किंवा इतरांनी दाखविल्याचे दिसत नाही. लोकमान्य टिळक, वीर सावरकर यांचे धाडस तर विरळाच. सावरकरसारख्यांचा काँग्रेसशी संबंध नव्हता, पण संघ परिवाराशीही नव्हता. भारतीय जनता पक्षाचा तेव्हा जन्मही झाला नव्हता. त्यामुळे काँग्रेस पक्ष हिंमतवाला होता, डरपोक नव्हता. देशभक्तीशी त्यांचे अतूट नाते तेव्हा होतेच, पण तो काँगेस पक्ष आज उरलेला नाही.
- एक काळ असा होता की, काँगेसच्या नावावर दगड उभा केला तरी तो निवडणुकीत विजयी होत असे. काँगेसची उमेदवारी म्हणजे विजयाची पक्की गॅरंटी. हे चित्र आज बदलले आहे व काँग्रेस अस्तित्वासाठी संघर्ष करीत आहे. गांधी घराण्यानंतर नरसिंह राव, मनमोहन सिंग (दोन वेळा) हे दोन पंतप्रधान काँग्रेसने दिले. तेव्हा काँग्रेसची सूत्रे सोनिया गांधींकडेच होती व या काळात काँग्रेसला गळती लागली असे दिसले नाही. ज्योतिरादित्य, जितीन प्रसाद हे ‘संघवाले’ तेव्हा मनमोहन मंत्रिमंडळात होते. या दोघांनाही काँग्रेसनेच घडवले व भरपूर दिले. काँग्रेसमध्ये असताना हे दोघेही भाजप आणि संघावर जोरदार हल्ले करीत होते, पण काँग्रेसचे घर फिरल्यावर वासेही फिरले. ‘जी 23’ या काँग्रेसअंतर्गत गटानेही धुसफूस सुरू केली आहे. गुलाम नबी आझाद यांच्या नेतृत्वाखाली हा ‘जी 23’ म्हणजे धुसफूस गट आज कार्यरत आहे. या धुसफूस गटामागेही संघ परिवारच असावा असे राहुल गांधींचे मत असू शकते.
काँग्रेस पक्षाला नक्की काय करायचे आहे व त्यांची दिशा कोणती याबाबत संभ्रम आहे. प्रियंका गांधी या दोन दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशात गेल्या तेव्हा लोकांचा त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. राहुल गांधी रस्त्यावर उतरतात तेव्हा त्यांच्या भोवतीही गर्दीचा माहोल बनतो, पण या संघर्षात सातत्य हवे. राजकारणात प्रवाह थांबला तर डबके होते हे सदैव लक्षात ठेवले पाहिजे. संघ परिवारावर हल्ला केल्याने काँग्रेस काय किंवा सेक्युलर म्हणवून घेणारे पक्ष काय, किती बळकट होणार आहेत? संघाचे देशभर पसरलेले जाळे हीच भारतीय जनता पक्षाची ताकद आहे. संघाला वजा केले तर भाजप पांगळा होईल हे सत्य आहेच. संघाच्या विचारांविषयी एखाद्याचे मतभेद असू शकतात, पण अनेक क्षेत्रांत ते करीत असलेले काम महत्त्वाचे आहे. सर्वस्व झोकून देत काम करणारे प्रचारक व स्वयंसेवक यांना दुर्लक्षून चालणार नाही. असे झोकून काम करणारे लोक पूर्वी काँग्रेस पक्षातही होतेच. आज असे लोक शिवसेनेत आहेत, असेही शिवसेनेने म्हटले आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)