Shiv Sena MLA Disqualification Case: शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकालपत्र तयार, काऊंटडाऊन सुरु; नार्वेकरांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष
देशभरात गाजलेल्या, सर्वोच्च न्यायालयातही पोहोचलेल्या आणि महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाला कलाटणी देणाऱ्या अत्यंत ऐतिहासिक अशा शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा (Shiv Sena MLA Disqualification Case) निकाल तयार असल्याचे समजते आहे.
देशभरात गाजलेल्या, सर्वोच्च न्यायालयातही पोहोचलेल्या आणि महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाला कलाटणी देणाऱ्या अत्यंत ऐतिहासिक अशा शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा (Shiv Sena MLA Disqualification Case) निकाल तयार असल्याचे समजते आहे. राज्य विधिमंडळातील विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Vidhan Sabha Speaker Rahul Narwekar) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) अशा दोन्ही गटांची बाजू ऐकूण घेतली आणि त्यानंतर हे निकालपत्र तयार केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या मर्यादा आणि निकष यांवर हे निकालपत्र अवलंबून असेल असे सांगितले जात असले तरी, त्यात नेमके काय आहे याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. येत्या 10 जानेवारीपर्यंत निकाल देणे अपेक्षीत आहे. त्यामुळे निकाल आता केवळ काही तासांवर आल्याने काऊंटडाऊन सुरु झाले असून उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
मुदतीपूर्वी निकाल लागण्याची शक्यता
राजकीय वर्तुळात अशीही चर्चा आहे की, सर्वोच्च न्यायालयाने आमदार अपात्रता प्रकरणी 10 जानेवारीपर्यंत निकाल जाहीर करण्याचे निर्देश दिले असले तरी त्या आधीही हा निकाल जाहीर होऊ शकतो. राजकीय चर्चा गृहित धरली तर, हा निकाल आज (8 जानेवारी) किंवा उद्या (9 जानेवारी) जाहीर होणे अपेक्षीत आहे. 'लोकसत्ता' डॉट कॉमने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, विधानसभा अध्यक्षांनी संपूर्ण निकाल तयार केला आहे. मात्र, निकालपत्राचा मसूदा कायदेशी अभिप्रायासाठी दिल्लीला पाठवल्याचे समजते. (हेही वाचा, Rahul Narwekar On MLAs Disqualification Case: असंवैधानिक निर्णय झाला तरच सर्वोच्च न्यायालय हस्तक्षेप करेल; राहुल नार्वेकर यांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य)
विधनसभा अध्यक्षांकडून झुकते माप कोणाला?
केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाकरे शिंदे वादात एकनाथ शिंदे यांना झुकतं माप दिलं. ज्यामुळे शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह शिंदे गटाला बहाल केले. त्यामुळे आता राहुल नार्वेकर आपल्या निकालात नेमकी काय भूमिका घेतात याबाबत उत्सुकता आहे. अर्थात निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयाचा आपल्या सुनावणीवेळी आणि निकालामध्ये विचार करु नये. विधानसभा अध्यक्ष स्वतंत्रपणे विचार करु शकतात, असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात स्पष्टपणे म्हटले आहे. तसेच, शिवसेना पक्षात जेव्हा फूट पडली तेव्हा मूळ पक्ष नेमका कोणाकडे होता याबाबतही अध्यक्षांना स्वतंत्र विचार करण्याची मुभा सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. त्यामुळे नार्वेकर यांच्या भूमिकेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. (हेही वाचा, Eknath Shinde पायउतार? फडणवीसांच्या स्पष्टीकरणानंतरही चर्चा सुरुच)
एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्री पद राहणार की जाणार?
विधानसभा अध्यक्षांच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण, या निकालावरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या सोबतच्या 16 आमदारांचे भविष्य ठरणार आहे. निकाल जर एकनाथ शिंदे यांच्या विरोधात गेला तर त्यांना मुख्यमंत्री पदावरुन बाजूला व्हावे लागेल. परिणामी सरकार कोसळेल. त्यामुळे या निकालाबाबत सत्ताधारी आणि विरोधकांसह जनतेचे लक्ष लगले आहे.