शिवसेना पक्षाला भविष्यात NDA मध्ये आमंत्रण मिळण्याची शक्यता कमी: भाजपा चे राम माधव यांची संजय राऊत यांच्यावर देखील शाब्दिक हल्ला

राम माधव यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करताना त्यांचा उल्लेख उद्धव ठाकरे यांचे 'जोसेफ गोबेल्स' आहेत असा करताना,उद्धव यांची तुलना माधव यांनी हिटलरशी केली आहे.

Ram Madhav - Sanjay Raut (Photo Credits: IANS)

महाराष्ट्रात सत्ता कोंडी कायम असताना अजूनही शिवसेना - भाजपा पक्षाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 च्या मतदान निकालामध्ये शिवसेना - भाजपा पक्षाला मतदारांचा कौल मिळाला असला तरीही सेना आणि भाजपा यांच्यामध्ये 'मुख्यमंत्रीपदा'वरून युती तुटल्यात जमा आहे. आज शिवसेनेला टोला लगावताना भाजपाचे राम माधव (Ram Madhav) यांनी सेना खासदार संजय राउत (Sanjay Raut) यांचा उल्लेख शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)  यांचे 'जोसेफ गोबेल्स' असा केला आहे.

महाराष्ट्रात सत्ता स्थापन न होण्याला शिवसेनेचा 'मुख्यमंत्रीपदा'चा हट्टीपणा जबाबदार आहे. असे अमित शहा यांनी स्पष्ट केल्यानंतर आज राम माधव यांनीही शिवसेनेवर शाब्दीक हल्ला चढवला आहे. शिवसेनेला भविष्यात राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (NDA)सहभागी होण्यासाठी निमंत्रित केले जाण्याची शक्यता कमी वाटते, असे म्हणत राम माधव यांनी शिवसेनेसाठी एनडीएचे दरवाजे भाजपकडून बंद झाले आहेत अशा प्रकारचे विधान राम माधव यांनी केले आहे. राम माधव यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करताना त्यांचा उल्लेख उद्धव ठाकरे यांचे 'जोसेफ गोबेल्स' आहेतअसा करताना,उद्धव यांची तुलना माधव यांनी हिटलरशी केली आहे. दरम्यान लोकसभेच्या वेळेस एनडीए सोबत असलेल्या शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी राजीनामा दिला आहे.

दरम्यान शिवसेना आणि भाजपा पक्ष विधानसभा निवडणूकीपूर्वी एकत्र मतदारांसमोर गेली. मात्र निवडणूक निकालानंतर शिवसेनेसोबत अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद वाटून घेण्यास भाजपा तयार नसल्याने सत्ता स्थापनेच्या वेळेस दोन्ही पक्ष एकत्र न आल्याने सध्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. विधानसभा निवडनूक निकालामध्ये शिवसेनेला 56 तर भाजपाला 105 जागांवर विजय मिळाला आहे. या दोन्ही पक्षांची युती कायम राहिली असल्यास राज्यात सत्ता स्थापनेसाठी आवश्यक 145 चा आकडा गाठणं शक्य होतं. मात्र या दोन्ही पक्षांमध्ये सत्ता वाटपावरून वाद झाल्याने आता शिवसेना राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्षासोबत सत्ता स्थापनेच्या तयारीमध्ये आहे. त्यादृष्टीने तयारी सुरू आहे.