महिला मतदारांचा जनाधार वाढविण्यासाठी शिवसेनेची 2 ऑगस्टपासून माऊली संवाद यात्रा
विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेना सचिव आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी आणि समाजातील सर्वच घटकांतील महिलांशी 'माऊली संवाद' च्या माध्यमातून संवाद साधणार आहेत.
लोकसभा निवडणुकीमध्ये महिला मतदारांचा भरघोस प्रतिसाद लक्षात घेता, महिला मतदारांचे वाढते प्रमाण लक्षात घेता शिवसेनेने (Shivsena) 'माऊली संवाद' उपक्रम सुरु केला आहे. विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेना सचिव आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी आणि समाजातील सर्वच घटकांतील महिलांशी 'माऊली संवाद' च्या माध्यमातून संवाद साधणार आहेत.
विधानसभा निवडणुकीपूर्वी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मतदारांचे आभार मानण्यासाठी जन आशीर्वाद यात्रा सुरू केली आहे. या यात्रेदरम्यान ते तमाम मतदार बांधवांशी संवाद साधणार आहे. त्यांच्यापाठोपाठ आता आदेश बांदेकर हे तळागळातील महिला मतदारांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा आणि ते सोडविण्याचा प्रयत्न करणार आहेत.
या निवडणुकीत एकूण मतदारांपैकी अर्धी मतदार संख्या महिलांची आहे. त्यामुळे शिवसेनेसाठी महिलांचा जनाधार वाढावा यासाठी शिवसेनेने आदेश बांदेकर यांना निवडणुकांच्या मैदानात उतरवायचे ठरवले आहे.
या उपक्रमाची सुरवात 2 ऑगस्टला पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातून होणार आहे. एकीकडे आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून तरुणांची तर दुसरीकडे बांदेकर यांच्या माध्यमातून महिला वर्गाची अशी दुहेरी मते मिळविण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असून या उपक्रमाचा शिवसेनेला किती फायदा होतोय हे विधानसभा निवडणुक निकालांमध्येच स्पष्ट होणार आहे.