Rajya Sabha Election 2022: संभाजीराजे छत्रपती यांचा पत्ता कट? शिवसेनेकडून राज्यसभेसाठी कोल्हापूरचे संजय पवार रिंगणात उतरण्याची शक्यता

कोल्हापूरचे (Kolhapur) शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार (Sanjay Pawar) यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचे समजते.

Sambhajiraje Chhatrapati, Sanjay Pawar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

शिवसेना (Shiv Sena) पक्षाकडून राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Election 2022) सहव्या जागेसाठी उमेदवार जवळपास निश्चित झाला आहे. कोल्हापूरचे (Kolhapur) शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार (Sanjay Pawar) यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. शिवसेनेकडून या नावाची अधिकृत घोषणा अद्याप झाली नाही. मात्र, लवकरच ती केली जाईल, असे सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. दरम्यान, यावरुन राजकीय वर्तुळात एक मात्र निश्चित मानले जात आहे की, शिवसेनेकडून संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांच्या नावाचा पत्ता कट झाला आहे.

छत्रपती संभाजीराजे यांनी अपक्ष उमेदवारी जाहीर करत सर्वपक्षीयांनी आपल्याला पाठिंबा द्यावा अशी भूमिका घेतली होती. त्यांनी शिवसेनेकडेही मदत मागितली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संभाजीराजे छत्रपती यांच्यात एक बैठकही पार पडली होती. मात्र, संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेत प्रवेश करत शिवबंधन बांधावे आणि मगच उमेदवारी जाहीर करवी. शिवसेना त्यांना पाठिंबा देईल. ते शिवसेनेच्या तिकीटावर खासदार होऊ शकतात, अशी शिवसेनेची भूमिका होती. शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम होती. (हेही वाचा, Rajya Sabha Election 2022: मुख्यमंत्री जसं ठरलंय तसेच करतील; संभाजीराजे छत्रपती यांची एका वाक्यात प्रतिक्रिया)

दरम्यान, संभाजीराजे छत्रपती यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले की, 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी सविस्तर चर्चा झाली आहे. पुढे काय करायचं, ते सविस्तर ठरलेलं आहे. मला पूर्ण विश्वास आहे की ते त्याप्रमाणे करतील. मला हाही विश्वास आहे की ते छत्रपती घराण्याचा सन्मान करतील'. संभाजीराजे छत्रपती यांच्या विधानामुळे मुख्यमंत्री आणि छत्रपती संभाजीराजे यांच्यात नेमके काय ठरले आहे याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. असे असतानाच कोल्हापूरचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे.

संजय पवार कोण आहेत?

संजय पवार हे कोल्हापूरचे शिवसेना जिल्हा प्रमुख आहेत. पाठीमागील 30 वर्षे ते शिवसेनेत सक्रीय आहेत. कट्टर शिवसैनिक अशी त्यांची ओळख आहे. 1989 मध्ये शिवसेनेत प्रवेश केल्यापासून ते कट्टर शिवसैनिक आहेत. कोल्हापूर महापालिकेत ते तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. पाठीमागील 30 वर्षे ते शिवसेनेकडून विधानसभेचे तिकीट मिळावे यासाठी प्रयत्न करत होते. पण ऐनवेळी तिकीट त्यांना हुलकावणी देत होते. सर्वसामान्यांच्या बाजूने सर्वसामान्यांचे प्रश्न मांडणारा नगरसेवक अशी त्यांची ओळख होती. भाजप, काँग्रेस अशा अनेक पक्षांनी त्यांना अनेक वेळी विविध अमिष दाखवली. पक्षप्रवेशाच्या ऑफर दिल्या. मात्र, असे असूनही त्यांनी शिवसेना आणि शिवसेनेचा भगवा सोडला नाही. त्यामुळे त्यांची पक्षनिष्टा आता कामाला येणार असे चित्र सध्यातरी दिसते आहे.