Shiv Sena In Crisis: एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क झाला - संजय राऊत
शिवसेनेत महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसणारी औलाद निर्माण होणार नाही, असा विश्वासही संजय राऊत यांनी या वळी व्यक्त केला. ते मुंबई येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे नॉट रिचेबल होणे आणि त्यानंतर प्रसारमाध्यमांतून उढालेला कोलाहाल यावर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाष्य केले आहे. शिवसेना (Shiv Sena) हा निष्टावंत शिवसैनिकांचा पक्ष आहे. पदं आणि सत्तेसाठी शिवसेना विकली जाणारी नाही. जे शिवसेना सोडून गेले आहेत त्यांची अवस्था आज काय झाली आहे. हे आपण पाहता आहात असे म्हणत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. जे शिवसेनेवर वार करत आहे ते महाराष्ट्रावर वार करत आहे. शिवसेनेवर वार करणे म्हणजे महाराष्ट्रावर वार करण्याप्रमाणेच आहे. शिवसेनेत महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसणारी औलाद निर्माण होणार नाही, असा विश्वासही संजय राऊत यांनी या वळी व्यक्त केला. ते मुंबई येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत संपर्क झाल्याचेही संजय राऊत यांनी या वेळी सांगितले. मात्र, शिंदे यांच्यासोबत नेमकी काय चर्चा झाली. शिंदे यांची नेमकी भूमिका काय याबाबत मात्र बोलणे त्यांनी टाळले. काही ठिकाणी संशय यावा अशी स्थिती नक्की आहे. असे असले तरी काळजी करण्याचे कारण नाही. जे संपर्काच्या बाहेर आहेत ते लवकरच संपर्कात येतील. अनेक आमदारांशी संपर्क झाला आहे. त्यांच्याशी बोलल्यानंतर लक्षात आले की त्यांना संभ्रमित करुन सूरतला नेण्यात आले आहे. अनेक लोकांनी सांगितले की, त्यांना सूरतला नेण्यात आले आहे. मात्र, त्यांना कशासाठी तेथे नेण्यात आले आहे याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. (हेही वाचा, Shiv Sena: शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर? एकनाथ शिंदे यांच्यासोबत मोठ्या संख्येने आमदार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संजय राऊत, मिलिंद नार्वेकर यांच्याकडून डॅमेज कंट्रोल सुरु)
प्रसारमाध्यमांतून जे दावे केले जात आहेत त्यात पूर्ण तथ्य नाही. ज्या आमदार, मंत्र्यांची नावे घेऊन प्रसारमाध्यमे ते नॉट रिचेबल असल्याचे सांगत आहेत. त्यांच्यातील अनेकांशी संपर्क झाला आहे. शिवसेनेत भूकंप होणार, असे जे काही चित्र रंगवले जात आहे, त्यामध्ये तथ्य नसल्याचेही संजय राऊत यांनी म्हटले. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुजरातमध्ये असलेल्या काही आमदारांशी आमचा संपर्क झाला आहे. तसेच शिंदेसोबत गेले म्हणून सांगण्यात येत असलेले शिवसेनेचे अनेक आमदार मातोश्रीवर दाखल झाले असल्याचेही राऊत यांनी म्हटले आहे.