Shiv Sena Dasara Melava 2022: शिवाजी पार्क मैदान मिळण्याबाबत साशंकता, दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाकडून इतर जागांसाठीही चाचपणी

निर्णय महापालिका प्रशासनाच्या कोर्टात आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंमध्ये उत्सुकता आहे.

Uddhav Thackeray, Eknath Shinde | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

शिवसेना आणि शिवाजी पार्क (Shivaji Park) मैदानावरील दसरा मेळावा (Dasara Melava 2022) हे पाठिमागील अनेक वर्षांपासून चालत अलेले समिकरण. महाराष्ट्र आणि देशाच्याही जनमानसात घट्ट झाले आहे. यंदा मात्र या समिकरणाबाबत काहीसे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या बंडामुळे खरी शिवसेना कोणाची हाच प्रश्न आता निर्माण झाला आहे. हा प्रश्न न्यायालयात प्रलंबित आहे. या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्क मैदानात दसरा मेळावा घेण्यासाठी परंपरेने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेने आणि शिवसेना आमचीच असा दावा करणाऱ्या एकनाथ शिंदे गटानेही मुंबई महापालिकेकडे अर्ज केला आहे. निर्णय महापालिका प्रशासनाच्या कोर्टात आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंमध्ये उत्सुकता आहे.

शिवाजी पार्क मैदान एकच असल्याने आणि केवळ ऐतिहासिक परंपरा लाभल्यानेच या मैदानावर मेळावा घेण्यासाठी शिवसेनेला आजवर परवानगी मिळत आली आहे. अन्यथा, शिवाजी पार्कवर राजकीय कार्यक्रमांना परवानगी नाही. त्यामुळे शिवाजी पार्कवर दोनपैकी कोणत्या तरी एका गटास (उद्धव ठाकरे अथवा एकनाथ शिंदे) परवानगी मिळणार किंवा दोन्ही गटांनाही परवानगी मिळणार नाही. हे दोनच पर्याय उरतात. त्यामुळे कोणत्या तरी एका गटास परवानगी मिळणार नाही. हे निश्चीत. तसे घडले तर पर्याय काय? याबाबत दोन्ही गटांमध्ये (स्वतंत्र) खलबतं सुरु आहेत.

दरम्यान, दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळाले नाही तर काय? या प्रश्नाच्या उत्तरादाखल पर्यायी मैदानाबाबत खल सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटाची याच मुद्द्यावर एक बैठक चर्चगेट येथील यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) प्रतिष्ठानसमोरील महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वास्तूत पार पडते आहे. ही बैठक आज सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पार पडणार असल्याचे समजते. दरम्यान, शिवाजी पार्कवर जर परवानगी मिळाली नाही तर वांद्रे कुर्ला संकुलातील मैदानावर घ्यायचा का? यावर या बैठकीत चर्चा होणार असल्याचे समजते.

दरम्यान, महापालिकेकडे प्राप्त झालेल्या अर्जांवर पालिका प्रशासन छाननी करत आहे. त्यानुसार एक अहवाल महापालिका आयुक्तांकडे पाठविण्यात येईल. त्यानंतर मुंबई महापालिकेचे आयुक्त या मैदानावर कोणाला परवानगी द्यायची याबाबत स्वत: निर्णय जाहीर करतील असे सांगण्यात येत आहे.