Kangana Ranaut, Hathras Gang-rape and Shiv Sena: कंगना रनौत हिच्यासाठी गळे काढणाऱ्यांवर शिवसेनेचे हाथरस प्रकरणावरुन प्रहार
‘बेटी बचाव’वाल्यांच्या ढोंगी रामराज्यात एक बेटी बचाव बचाव असा आक्रोश करत तडफडून मेली. यावेळी तिला न्याय मिळाला पाहिजे म्हणून सुशांतप्रमाणे कोणी प्रखर आंदोलन चालवले नाही. नटी कंगनाच्या घरावर हातोडा पडताच काय हा अन्याय? असे बोंबलणारा मीडियादेखील कंठशोष करताना दिसला नाही.. का?
कंगना रनौत (Kangana Ranaut) हिच्या बेकायदेशीर बांधकामावर मुंबई महापालिका (BMC) प्रशासनाने कारवाई केली. त्यामुळे दु:खी झालेल्या अनेक राजकीय पक्ष, वृत्तवाहिन्यांनी शिवसेना (Shiv Sena), मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनाही जबाबदार धरत जाब विचारला. या सर्वांना हाथरस सामूहिक बलात्कार ( Hathras Gang Rape) प्रकरणावरुन शिवसेनेने मुखपत्र सामनाच्या (Daily Saamana Editorial) माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे. ' एका नटीची भिंत पाडली म्हणून किंचाळणारा समाज एका बेटीवर बलात्कार, हत्या होऊनही शांत आहे. भावनेचा कडेलोट आणि कायद्याचे वस्त्रहरण झाले आहे', अशा शेलक्या शब्दात सामना (Saamana Editorial) संपादकीयातून उत्तर प्रदेशातील हाथरस प्रकरणावरुन योगी सरकार, मोदी सरकार आणि भाजपावर टीकेची झोड उठवण्यात आली आहे.
सामना सपादकीयातील ठळक मुद्दे
- उत्तर प्रदेशातील हाथरस या ठिकाणी 19 वर्षांच्या तरुणीवर बलात्कार झाला. नंतर तिच्यावर हल्ला करण्यात आला. उपचार घेत असताना तिचा मृत्यू झाला. ‘बेटी बचाव’वाल्यांच्या ढोंगी रामराज्यात एक बेटी बचाव बचाव असा आक्रोश करत तडफडून मेली. यावेळी तिला न्याय मिळाला पाहिजे म्हणून सुशांतप्रमाणे कोणी प्रखर आंदोलन चालवले नाही. नटी कंगनाच्या घरावर हातोडा पडताच काय हा अन्याय? असे बोंबलणारा मीडियादेखील कंठशोष करताना दिसला नाही.. का?
- कंगना रणौतने जेव्हा मुंबई आणि महाराष्ट्राच्या विरोधात वक्तव्यं केलं तेव्हा शिवसेना आमदार प्रताप सरनाईक म्हणाले होते की यापुढे तिने अशी वक्तव्यं केली तर शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्या कंगनाचे थोबाड फोडतील. यावर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी कंगनाच्या सन्मानाचा आणि सुरक्षेचा मुद्दा समोर आणला होता. तोच महिला आयोग आज हाथरस प्रकरणात शांत बसला आहे. हाथरच्या बालात्कार पीडितेचा आक्रोश दिल्लीपर्यंत पोहचू शकला नाही हा प्रकारच धक्कादायक आहे. (हेही वाचा, Hathras Case: हे लोकशाहीवर 'गँगरेप' होत असल्याचेच लक्षण- शिवसेना)
- हाथरस येथील बलात्कार पीडितेचा 29सप्टेंबरला मृत्यू झाला तेव्हा दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयाबाहेर लोक जमले. धरणे आंदोलन सुरु झाले होते. दिल्लीपासून 200 किमी अंतरावर असलेल्या हाथरसमध्ये पोलिसांनी चुपचाप पीडित मुलीची चिता पेटवली. तिच्या नातेवाईकांना घरातच कोंडून ठेवले. अँब्युलन्समधून मुलीचा मृतदेह जाळण्यासाठी नेत आहेत हे समजताच मुलीच्या आईने स्वतःला अँब्युलन्सवर झोकून दिले. तेव्हा पोलिसांनी तिला फरफटत दूर नेले. हे एवढे भय आणि अमानुषता कशासाठी? हाथरसला जे घडले त्यामुळे देशाची परंपरा, संस्कृती यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, काँग्रेस नेते राहुल आणि प्रियंका गांधी या पीडित मुलीच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी गेले तेव्हा पोलिसांनी त्यांना फक्त अडवले नाही, तर त्यांची कॉलर पकडून खाली पाडले. महिनाभरापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत आले होते. त्यांनी रामजन्मभूमिची पूजा केली. त्यावेळी श्रीरामासोबत सीतामाईचा वावर तिथे होता. त्याच भूमिवर एक नवी निर्भया स्वतःच्या शरीराची लक्तरे उघड्यावर टाकून तडफडून मेली. हे सगळे त्याच उत्तर प्रदेशात घडले जिथे भाजपाचे सरकार आहे. अशा प्रकारची घटना महाराष्ट्रात घडली असती तर सरकार बरखास्तीची, राष्ट्रपती राजवटीची मागणी झाली असती. उत्तरप्रदेशबाबत अशी मागणी होताना दिसत नाही, असा टोलाही शिवसेनेने लगावला आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)