IPL Auction 2025 Live

Thane: शिवसेना शाखेवरुन ठाकरे विरुद्ध शिंदे गट आमनेसामने, पोलिसांच्या समयसूचकतेमुळे ठाण्यात राडा टळला

त्यांच्यातील संघर्षाचा मुद्दा आहे 'शिवसेना शाखा'. ठाणे (Thane) जिल्ह्यातील कोपरी येथील कुंभारवाडा शाखा (Kumbharwada) ताब्यात घेण्यावरुन शिवसेना आणि शिंदे समर्थकांमध्ये आज जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. या वेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त होता.

Shiv Sena Kumbharwada Office | (File Image)

शिवसेना (Shiv Sena) निवडणूक चिन्ह असलेल्या धनुष्यबाणाचे काय होणार? याबातब निवडणूक आयोगामोर आज सुनावणी होणार होती. मात्र, काही कारणाने ती पुढे ढकलण्यात आल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले. दरम्यान, खरी शिवसेना कोणाची, धनुष्यबाण कोणाचा यावर न्यायालय आणि निवडणूक आयोगात लढा सुरुच राहिल. पण, सर्वसामान्य शिवसैनिक आणि शिंदे गटातील (Shinde Group) कार्यकर्ते वेगळ्याच संघर्षाला सामोरे जात आहेत. त्यांच्यातील संघर्षाचा मुद्दा आहे 'शिवसेना शाखा'. ठाणे (Thane) जिल्ह्यातील कोपरी येथील कुंभारवाडा शाखा (Kumbharwada) ताब्यात घेण्यावरुन शिवसेना आणि शिंदे समर्थकांमध्ये आज जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. या वेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त होता. दोन्ही गटांनी चर्चा आणि संवादाचा मार्ग अनुसरल्यामुळे होणारा संभाव्य राडा टळला. मात्र, दोन्ही गटातील संघर्षाची धग मात्र कायम आहे.

प्राप्त माहितीनुसार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व मानणारे कार्यकर्ते आज (7 ऑक्टोबर) कुंभारवाडा शाखेत बसले होते. या वेळी शिंदे गटाचे कार्यकर्ते तिथे आले. दोन्ही बाजूंनी सुरुवात चर्चेतून झाली. ही चर्चा पुढे वादावादी आणि बाचाबाचीत बदलली. शिंदे गटातील काही स्थानिकांनी शाखेवर दावा सांगितला. त्यामुळे दोन्ही गटांमध्ये वाद सुरु झाला. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेऊन पोलीस बंदोबस्त वाढवला. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली. तरीही परिसरात काही काळ तणाव होता. (हेही वाचा, Shiv Sainiks Vs Shinde Camp: उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिक विरुद्ध एकनाथ शिंदे समर्थकांमध्ये डोंबिवली शाखेत राडा)

कुंभारवाडा येथील शाखा पाठिमागील अनेक वर्षे आम्ही सांभाळतो. शाखेची देखभाल, सेवा आणि डागडुजी हे सर्व आम्ही वर्षानुवर्षे करत आलो. त्यामुळे शाखा आमचीच आहे. शाखेवर आमचाच हक्क राहिल. ती आम्ही बाहेरच्या कोणत्याच व्यक्तीला ताब्यात घेऊ देणार नाही, अशी भूमिका स्थानिकांनी घेतली. यावेळी शाखाही पक्षाची आहे, अशी भूमिका शिवसैनिकांनी घेतली.

दोन्ही बाजू आक्रमक असल्याचे पाहून पोलिसांनीच हस्तक्षेप केला. पोलिसांच्या उपस्थितीत शाखेला टाळं लावण्यात आले. या टाळ्याच्या दोन चाव्यांपैकी एक चावी उद्धव ठाकरे गटाला आणि दुसरी शिंदे गटाला देण्यात आली. दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकाच शाखेत दोन वेगवेगळ्या ठिकाणी बसतील, असाही तोडगा काढण्यात आल्याचे समजते. दोन्ही गटांतील कार्यकर्ते शाखेत बसण्यासाठी सामंजस्याने वेळ ठरवतील असेही सांगण्यात येत आहे.