स्वत:चे कान पकडत शिशिर शिंदे यांच्याकडून बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन
त्यांच्या जयंतीनिमित्त असंख्य शिवसैनिक, शिवसेना ( Shiv Sena) पदाधिकारी आणि विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांसह अनेक मान्यवर शिवतिर्थावर जाऊन बाळासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन करत आहेत.
माजी आमदार शिशिर शिंदे (Shishir Shinde) यांनी शिवतिर्थावर (Shivtirth) जाऊन स्वत:चे कान पकडत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या स्मृतीस अभिवादन केले. शिशिर शिंदे यांना त्यांच्या या कृतीबाबत विचारले असता, आजवर केलेल्या चुकांबद्दल आपण बाळासाहेबांकडे माफी मागितील. तसेच, यापुढेही आपल्याला पहिल्यासारखेच उत्साहाने काम करण्याची उर्जा मिळावी यासाठी बाळासाहेबांकडे आशीर्वादही मागितल्याचे शिशिर शिंदे यांनी सांगितले. बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त असंख्य शिवसैनिक, शिवसेना ( Shiv Sena) पदाधिकारी आणि विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांसह अनेक मान्यवर शिवतिर्थावर जाऊन बाळासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन करत आहेत.
या वेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना शिशिर शिंदे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे हे अद्वितीय व्यक्तीमत्व होते. आजही ते आमच्यात आहेत. घरातून बाहेर पडताना आजही आपण बाळासाहेबांच्या प्रतिमेस अभिवादन करुनच बाहेर पडतो. आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आहेत. त्याचा मला फार आनंद होतो आहे. बाळासाहेबांनतर उद्धव ठाकरे यांनी अत्यंत अडचणीतून मार्ग काढत मोठ्या कार्यक्षमतेने शिवसेना सांभाळली. मोठ्या हिमतीने बिकट स्थितीतूनही त्यांनी अत्यंत खंबीर आणि कणखरपणे शिवसेना पुढे नेली, असे कौतुगोद्गारही शिशिर शिंदे यांनी काढले.
दरम्यान, एबीपी माझाशी बोलताना शिशिर शिंदे म्हणाले, हे सरकार लोकांचं काम करणारे सरकार आहे. लोकांचा मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे काम करतील याचा मला विश्वास आहे, असेही शिशिर शिंदे म्हणाले. दरम्यान, ज्या पक्षातून शिशिर शिंदे यांनी शिवसेनेत घरवापसी केली त्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचाही एक कार्यक्रम आज मुंबई येथे पार पडतो आहे. त्याबाबत विचारले असता, मनसेच्या कार्यक्रमाबद्दल आपल्याला काही माहिती नाही. आज मी शिवतिर्थावर आलो आहे. मी बाळासाहेब आणि शिवसेना याच विचारात आहे. त्यामुळे दुसऱ्या कार्यक्रमाबाबत मला माहिती नसल्याचे सांगत, मनसेच्या महावमेळाव्यावर बोलण्यास शिंदे यांनी नकार दिला. (हेही वाचा, 'मनसे' चा नवा झेंडा वादाच्या भोवर्यात; संभाजी ब्रिगेड कडून स्वारगेट पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल)
शिशिर शिंदे हे मूळचे कट्टर शिवसैनिक. मात्र, मधल्या काळात राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष काढला. या वेळी शिशिर शिंदे यांनीही शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राज ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेतून बाहेर पडणे पसंत केले. मात्र कालांतराने राज ठाकरे यांची साथ सोडत आणि मनसेचा त्याग करत शिंदे यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी आता मी स्वगृही परतलो असून, एका हातात झेंडा आणि दुसऱ्या हातात धोंडा घेऊन आपण शिवसेने पक्षाचे एकनिष्ठपणे काम करु, असे शिंदे यांनी म्हटले होते.