Shirdi: तृप्ती देसाई यांना 8 ते 11 डिसेंबर दरम्यान शिर्डीत प्रवेश करण्यास बंदी; छोट्या कपड्यांबाबतचा वाद शिगेला 

तसेच जर तृप्ती देसाई यांनी आदेशाचे उल्लंघन केले तर त्यांना आयपीसी कलम 188 नुसार दोषी ठरवले जाणार आहे.

सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई (Photo credit: ANI)

महाराष्ट्रातील शिर्डी (Shirdi) साई बाबा मंदिराच्या (Sai Baba Temple) प्रशासनाने भाविकांना नोटीस बजावून आवाहन केले आहे की, मंदिरात दर्शनसाठी येताना भाविकांनी छोटे कपडे घालू नये तर भाविकांनी भारतीय वेशभूषेतच बाबांच्या दर्शनाला यावे. या ड्रेस कोडबाबत आता वाद सुरू झाला आहे. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी मंदिर प्रशासनाला आव्हान दिले आहे की, जर 10 डिसेंबरपर्यंत ही नोटीस हटवली नाही तर त्या स्वतः ही नोटीस काढून टाकतील. आता उपविभागीय कार्यालय, शिर्डी यांनी कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना 8 ते 11 डिसेंबर दरम्यान शिर्डीत प्रवेश न करण्याबाबत नोटीस बजावली आहे.

उपविभागीय कार्यालयाचे म्हणणे आहे की, देसाई यांचे इथे येणे हे कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात समस्या निर्माण करू शकते. तसेच जर तृप्ती देसाई यांनी आदेशाचे उल्लंघन केले तर त्यांना आयपीसी कलम 188 नुसार दोषी ठरवले जाणार आहे. आतापर्यंत साईबाबांच्या मंदिरात ड्रेस कोड नव्हता. भाविक स्वत: च्या मर्जीने कपडे घालून दर्शनासाठी येत असत. आता ट्रस्टने भाविकांना कपड्यांबाबत सक्ती केल्याने सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी या नोटीसबद्दल मंदिर प्रशासनाला प्रश्न विचारले आहेत.

याबाबत देसाई म्हणाल्या होत्या की, ‘मंदिर प्रशासनाने दिलेल्या नोटिसमध्ये लहान कपड्यांविषयी स्पष्टीकरण दिले गेले नाही, कारण जर असे असेल तर मंदिराचे पुजारी अर्ध-नग्न वस्त्रही परिधान करतात. अशा परिस्थितीत हा नियम त्यांनाही लागू होते. मी मंदिर प्रशासनाला आव्हान देते की जर दहा डिसेंबरपर्यंत मंडळाकडून नोटीस काढली गेली नाही तर मी स्वतः जाऊन ती नोटीस काढून टाकेन.’ (हेही वाचा: Trupti Desai: शिर्डी साई संस्थानने घेतलेल्या 'या' निर्णयावरून तृत्ती देसाई आक्रमक)

आता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (2) प्रमाणे प्राप्त अधिकारानुसार, तृप्ती देसाई यांना 8 डिसेंबर रात्री बारा वाजल्यापासून ते 11 डिसेंबर रात्री बारा वाजेपर्यंत शिर्डी नगरपंचायत हद्दीत प्रवेश करण्यास बंदी घालण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.