Shirdi Saibaba Temple: शिर्डी साईबाबा संस्थान ट्रस्टने राम मंदिरासाठी देणगी नाकारल्यानंतर हज समितीला दिले 35 कोटी रुपये? Fake Message व्हायरल, जाणून घ्या सत्य

तसेच मंदिर हजसाठी पैसे देत असल्याने शिर्डीवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे.

Shirdi Sai Baba | ((Photo Credit: sai.org)

शिर्डी साईबाबा मंदिर (Shirdi Saibaba Sansthan Trust) हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. देशातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक समजले जाते. आता शिर्डी साईबाबा संस्थानाबाबत एक संदेश व्हायरल होत आहे. शिर्डी साईबाबा संस्थान ट्रस्टने हज समितीला 35 कोटी रुपयांची देणगी दिल्याचा दावा करणारी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. प्रिन्स वर्मा या ट्विटर वापरकर्त्याने ही पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये हा दावा केला आहे. तसेच मंदिर हजसाठी पैसे देत असल्याने शिर्डीवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे.

महत्वाचे म्हणजे अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी शिर्डी मंदिराने पैसे देण्यास नकार देऊन हज समितीला 35 कोटी रुपयांची देणगी दिल्याचेही पोस्टमध्ये म्हटले आहे. ट्विटरवर वर्मा म्हणतात, ‘शिर्डी साई (पिंडारी चांद मिया) ट्रस्ट हजसाठी 35 कोटी दान करते. शिर्डीच्या फायनान्सर्सचा मोठा भाग सर्वसामान्य लोक आहेत. शिर्डी साईबाबा ट्रस्टने अयोध्या राममंदिरासाठी देणगी देण्यास नकार दिला. शिर्डीवर बहिष्कार टाका.’

वर्मा व्यतिरिक्त, अनेक इतर वापरकर्त्यांनीही असा दावा केला की शिर्डी साई ट्रस्टने हज समितीला 35 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. एका यूजरने म्हटले आहे की, ‘प्रिय चांद मिया (साई बाबा) प्रेमी कृपया मला सांगा की ट्रस्टने राम मंदिरासाठी किती देणगी दिली?’ काही पोस्ट्समध्ये असेही म्हटले आहे की, यापूर्वी साई बाबा मंदिराने राममंदिराच्या बांधकामासाठी पैसे देण्यास नकार दिला आहे. या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काही वापरकर्त्यांनी इतरांना शिर्डी मंदिराला भेट देणे थांबवण्यास सांगितले आहे.

मात्र, ही व्हायरल झालेली पोस्ट खोटी आहे व या पोस्टमध्ये केलेले दावेही खोटे आहेत. शिर्डीच्या साईबाबा संस्थानने इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या फेक न्यूजचे खंडन केले आहे. साई मंदिर ट्रस्टने अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामासाठी पैसे देण्यास नकार दिल्याच्या अफवा फेटाळून लावत, साई मंदिर ट्रस्टचे सीईओ राहुल जाधव यांनी क्विंटच्या वेबक्यूओफला सांगितले की हा दावा खोटा आहे. (हेही वाचा: मुंबई ते आळंदी बससेवा सुरू; माऊलींच्या भक्तांसाठी MSRTC ची खास भेट; जाणून घ्या वेळापत्रक, मार्ग)

मंदिराच्या सीईओने असेही सांगितले की, त्यांना रामजन्मभूमी ट्रस्टकडून देणगी मागणारी कोणतीही विनंती किंवा संदेश मिळालेला नाही. दुसरीकडे, साई मंदिर ट्रस्टच्या सीईओने हे देखील सांगितले की, व्हायरल सोशल मीडिया पोस्टमध्ये दावा केल्यानुसार त्यांनी हजसाठी कोणतीही रक्कम दान केलेली नाही. व्हायरल झालेले संदेश हे शिर्डी मंदिराची बदनामी करण्याचे षड्यंत्र असून अफवा पसरवणाऱ्यांवर लवकरच कारवाई करणार असल्याचे सीईओ राहुल जाधव म्हणाले.